CDCC Bank: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर आमरण उपोषणाचा सहावा दिवस; धनोजे कुणबी समाजाचा पाठिंबा

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीयांच्या (एससी, एसटी, ओबीसी) हक्कांचे उल्लंघन होत असल्याच्या निषेधार्थ आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीचे सदस्य मनोज पोतराजे यांनी 16 जानेवारी 2025 पासून बँकेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाचा सहावा दिवस असून या आंदोलनाला सामाजिक संघटनांचा व मान्यवरांचा व्यापक पाठिंबा मिळत आहे.

धनोजे कुणबी समाजाचे अध्यक्ष अँड. पुरुषोत्तम सातपुते, सचिव अतुल देऊळकर, ऍड. विलास मातनकर, प्राध्यापक अनिल डहाके (जिल्हाध्यक्ष, ओबीसी सेवा संघ) आणि भाऊराव झाडे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत उपोषणस्थळी भेट दिली. त्यांनी पोतराजे यांच्या संघर्षाला बळ देत एससी, एसटी, ओबीसींच्या आरक्षण हक्कांचे संरक्षण करण्याचे आवाहन केले.

मनोज पोतराजे यांचे आमरण उपोषण हे केवळ वैयक्तिक लढा नसून, मागासवर्गीय समाजाच्या हक्कांसाठी चाललेली चळवळ आहे, असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणीही करण्यात आली.

सध्या आंदोलनस्थळी विविध संघटनांचे कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती वाढत असून, या विषयाला चंद्रपूर जिल्ह्यात व्यापक प्रतिसाद मिळत आहे. प्रशासनाने या प्रकरणात ठोस भूमिका घेतली नाही, तर आंदोलन आणखी तीव्र होईल, असा इशारा दिला जात आहे.