ACB trap: वनपाल अडकला एसीबीच्या जाळ्यात

Bhairav Diwase

आलापल्ली:- घरकुल बांधकामासाठी जंगल परिसरातून माती वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून कारवाई टाळण्यासाठी तब्बल ८३ हजार रुपयांची लाच घेताना एफडीसीएमच्या एका अधिकारीला गडचिरोलीच्या अँटी करप्शन ब्युरोने रंगेहात पकडले आहे.

ही कारवाई प्राणहिता वन प्रकल्प विभाग, आलापल्ली अंतर्गत येत असलेल्या आलापल्ली वन परिक्षेत्र कार्यालयात ८ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास झाली. मारोती गायकवाड असे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव असून ती व्यक्ती वनपाल या पदावर कार्यरत होती.

अँटी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वनविकास महामंडळ प्रकल्प आलापल्ली तील आलापल्ली वनपरिक्षेत्रात समाविष्ट आपापल्ली उपक्षेत्रातील तानबोडी बिटातून फिर्यादी घरकुल बांधकाम करण्यासाठी माती वाहतूक करत होता.६ फेब्रुवारी रोजी एफडीसीएमच्या आलापल्ली कार्यालयातील वनपाल मारोती गायकवाड आणि वन मजुरांनी सदर ट्रॅक्टर पकडून दुसऱ्या दिवशी तडजोडीसाठी कार्यालयात बोलाविले.

मारोती गायकवाड यांनी फिर्यादीला तब्बल १ लाख १० हजारांची मागणी केली. तडजोडीअंती १ लाख देण्याचे ठरले. १७ हजार दंड ठोठावून त्यांनी ८३ हजार परस्पर स्वीकारले. मात्र, फिर्यादीला लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने एसीबीच्या पथकाकडे याची आधीच तक्रार केली होती. एसीबीच्या पथकाने ८ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास मारोती गायकवाड यांना लाच स्वीकारताना आलापल्ली वनपरिक्षेत्र कार्यालयात रंगेहात पकडून ताब्यात घेतले.

ही कारवाई गडचिरोली अँटी करप्शन ब्युरोचे डीवायएसपी चंद्रशेखर ढोले, पोलीस निरीक्षक शिवाजी राठोड, पोलीस निरीक्षक संतोष पाटील, एएसआय सुनील पेद्दीवार, हवालदार किशोर जंजाडकर, हवालदार शंकर डांगे, पोलीस अंमलदार संदीप उडाण, संदीप घोडमारे यांनी केली असून अहेरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.