नवी दिल्ली:- दिल्ली विधानसभा निवडणूक २०२५ मध्ये आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर, अतिशी मार्लेना आज (दि.९) दिल्लीच्या राजभवनामध्ये पोहोचल्या. यावेळी त्यांनी नायब राज्यपाल व्ही.के. यांची भेट घेत, त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा एलजींकडे सुपूर्त केला.
गेल्या वर्षी २१ सप्टेंबर रोजी अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अतिशी या केवळ साडेचार महिने दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी होत्या. अतिशी दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री बनल्या. त्यांच्या आधी, १५ वर्षे दिल्लीवर राज्य करणाऱ्या दिवंगत भाजप नेत्या सुषमा स्वराज आणि दिवंगत काँग्रेस नेत्या शीला दीक्षित या महिला दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या.
शनिवारी जाहीर झालेल्या ७० जागांच्या दिल्ली विधानसभेच्या निकालांमध्ये भाजपने ४८ जागा जिंकल्या आहेत. आम आदमी पक्षाला (आप) फक्त २२ जागा मिळाल्या आहेत, तर काँग्रेसला दिल्ली विधानसभेत सलग तिसऱ्यांदा एकही खाते उघडता आले नाही.
दिल्लीत भाजपच्या शानदार कामगिरीदरम्यान, अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यासह आम आदमी पक्षाच्या अनेक मोठ्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला, परंतु मुख्यमंत्री अतिशी व्यतिरिक्त, तीन मंत्री गोपाल राय, मुकेश अहलावत आणि इम्रान हुसेन यांनी त्यांच्या विजयाने पक्षाची विश्वासार्हता काही प्रमाणात जिवंत ठेवली. कालकाजी विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणूक लढवणाऱ्या आपच्या प्रमुख रणनीतीकार अतिशी यांनी भाजपच्या रमेश बिधुरी यांचा ३,५२१ मतांनी पराभव केला.