गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडादेव येथील वैनगंगा नदीत बुडून एका भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना आज(26 फेब्रुवारी) बुधवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. अभिषेक मेश्राम (रा. चंद्रपूर) असे मृतक भाविकाचे नाव आहे.
मार्कंडादेव येथे महाशिवरात्री यात्रेला सुरवात झाली असून यात्रेनिमित्त अनेक जण वैनगंगा नदीत स्नान करून मार्कंडेश्वराचे दर्शन घेत असतात. अशातच 5 युवा भाविक नदीत अंघोळ करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले असल्याची घटना घडली आहे.
यातील चार भाविक पाण्यातून बाहेर पडले तर एकाचा मात्र पाण्यात बुडून मृत्यू झालाय. दरम्यान ही घटना घडली त्यावेळी एसडीआरएफचे 5 बचाव पथक नदीत तैनात होते. मात्र बुडालेला भाविक हा मंदिरापासून फार लांब अंतरावर असल्याने आणि त्याबाबत कुठलीही कल्पना नसताना ही घटना घडली असल्याने त्याला वाचवू शकले नाही. दरम्यान या घटणेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.