नागपूर:- औरंगजेबाच्या कबरीवरून अख्या राज्यात वाद सुरू आहे. याच वादावरून मंगळवारी (ता.17) संध्याकाळी नागपूरच्या महाल परिसरात दोन गटांमध्ये संघर्ष झाला. ज्यामुळे तणाव वाढल्यानंतर येथे हिंसाचार भडकला. ज्यात पोलिसांवर दगडफेक करण्यासह रस्त्यावर उभ्या असणाऱ्या वाहणांची तोडफोड करत जाळपोळ करण्यात आली. ई-रिक्षा आणि ऑटो रस्त्यावर उलटवून रस्ता बंद करण्याचा प्रयत्न केला. यानंतर येथे मोठा तणाव निर्माण झाला असून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सध्या येथे तणावपूर्ण शांतता असून प्रभावित परिसरातील रस्तेही बंद करण्याचे आदेश नागपूर पोलिस आयुक्त रविंदर कुमार सिंगल यांनी दिले आहेत. जे पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहणार आहेत.
नागपुरात औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीवरून सोमवारी रात्री (17 मार्च) मोठा तणाव निर्माण झाला होता. यामुळ दोन गट आमने-सामने आले होते. यामुळे दगडफेक आणि जाळपोळच्या घटना घडली. सध्या येथे तणावपूर्ण शांतता आहे. भारतीय नागरीक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार शहरातील काही भागात संचारबंदी करण्यात आली आहे. आता ज्या भागात संचारबंदी आहेत तेथील रस्तेही बंद करण्याचे आदेश नागपूर पोलीस आयुक्त रविंदर कुमार सिंगल यांनी दिले आहेत.
पोलीस आयुक्त रविंदर कुमार सिंगल यांनी काढलेल्या आदेशांप्रमाणे नागपूरमधील संचारबंदी असणाऱ्या भागातील रस्ते पुढील सूचना मिळेपर्यंत बंद असणार असून येथे संचारबंदीही लागू असेल. तर पुढील सूचना मिळेपर्यंत निर्बंध लागू राहतील. तर या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 नुसार कारवाई होईल, असाही इशारा त्यांनी दिला आहे.
नागपूरमधील कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर येथील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत हिंसाचारानंतर संचारंबदी करण्यात आली आहे. दरम्यान, आयुक्त रविंदर सिंगल यांनी, सध्या येथील परस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले आहे. तर हिंसाचार झालेल्या भागात सध्या शांतता असून एक फोटो जाळण्यात आला होता. ज्यानंतर जमाव जमला. या गर्दीला पांगवण्याचा प्रयत्न आम्ही केला. पण काही समाजकंटकांनी उपद्रव माजवला. या संदर्भात आम्ही आरोपींवर कारवाई केली असून ती सुरू राहील, असे म्हटलं आहे.