तरूणांना करिअरची चिंता सतावत असल्याने पोलिस भरतीकडे युवा वर्गाचा कल वाढला आहे. पोलिस भरती करता चंद्रपूर शहरासह ग्रामीण भागातील युवक-युवती पहाटे पासूनच रामबाग, जिल्हा क्रिडा संकुल, रस्त्याने धावताना, व्यायाम करताना दिसून येत आहेत. पोलिस भरतीमध्ये यश मिळवण्यासाठी युवावर्ग कसून सराव करत असल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसत आहे.
तरूण वर्गाला करिअरची चिंता लागली असून नोकरी मिळविण्याच्या स्पर्धेत स्वतःला सिद्ध करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. सैनिकी क्षेत्रातील करिअरचे आकर्षण युवा वर्गात मोठ्या प्रमाणात असून अनेकांचे ते स्वप्न आहे. त्यामुळे आर्मी आणि पोलिस भरतीकडे युवकांचा कल वाढला आहे. पोलिस भरतीसाठी पहाटेपासूनच चंद्रपूर शहरासह ग्रामीण भागातील मुले-मुली सराव करतांना दिसत आहेत. ग्रामीण भागातील अनेक युवक-युवती पोलिस भरतीसाठी चंद्रपूर शहरातील ॲकडमीत प्रवेश घेतला आहे. सध्या युवक-युवती मोठ्या प्रमाणात पोलिस भरतीसाठी आवश्यक असलेल्या बाबींचा सराव करताना दिसून येत आहेत.
तरूण-तरूणी शासकीय नोकरीसाठी अनेक प्रकारचे प्रयत्न करत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. त्यामुळे रामबाग, जिल्हा क्रिडा संकुल या ठिकाणी पहाटेपासून पोलिस भरतीची मैदानी चाचणीचा सराव करताना दिसत आहेत. ग्रामीण भागातील अनेक तरुणांना विविध शाखांमध्ये उच्च प्रकारे शिक्षण घेऊन देखील नोकरी मिळत नाही. त्यामुळे तरुण वर्ग अडचणीत सापडलेला आहे. पर्यायाने अनेकांचा ओढा हा पोलिस भरतीकडे लागलेला आहे.
अनेकजण कुटुंबांला हातभार लावण्यासाठी मजुरी सुध्दा करत आहेत. कित्येक मुले - मुली शेती करणे किंवा शहरात दुकानात काम करताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी कष्टाची कामे करावी लागत आहेत. शिक्षणाचे महत्त्व त्यांच्या लक्षात आले आहे. आपल्या मुलांना काबाड कष्टाची गरज पडू नये. त्यांना चांगल्या प्रकारे नोकरी लागावी अशी सर्व पालकांची अपेक्षा असते. स्वतः कष्ट करून आपल्या पाल्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देण्याचा प्रयत्न पालक वर्ग करत आहेत. कित्येक जण पदवीधर होऊन बसले आहेत. परंतु सरकारी नोकरी मिळत नसल्यामुळे अनेक सुशिक्षित मुले-मुली हाताला मिळेल ते काम करताना दिसून येत आहेत.
तरुणांनी पोलिस भरतीसाठी मैदानी चाचणीसाठी जास्तीत जास्त सराव करावा. विशेषतः पहाटे धावणे व इतर शारीरिक चाचणीसाठी तयारी तर करावीच सोबत लेखी परीक्षेसाठी अभ्यास महत्त्वाचा आहे.
संचालक इंजि. जितेंद्र पिंपळशेंडे
उड़ान द करिअर ॲकडमी चंद्रपूर