पुणे:- कसबा पोटनिवडणुकीत जायंट किलर ठरलेले काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर अखेर काँग्रेसला रामराम ठोकणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून रवींद्र धंगेकर हे शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू होत्या. विधानसभा निवडणुकीनंतर धंगेकर यांनी ठाण्यात येऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर धंगेकर काँग्रेसला सोडून जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
तसेच काही दिवसांपूर्वी धंगेकर यांनी गळ्यात भगवा गमछा घातलेला फोटो आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवला होता. यानंतर त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजलं जात होतं. मात्र रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेस सोडून कुठेही जाणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. मी काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाही, मी आता काँग्रेस पक्ष संघटनेत सक्रीय होणार, असं स्पष्टीकरण रवींद्र धंगेकर यांनी दिलं होतं. पण आता अखेर रवींद्र धंगेकर एकनाथ शिंदे गटात जाणार असल्याचं निश्चित झाल्याचं म्हटलं जातंय.
पुण्यात एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसला धक्का दिला आहे. काँग्रेसचे माजी आमदार राहिलेले रवींद्र धंगेकर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज संध्याकाळी ठाण्यात हा पक्ष प्रवेश होणार आहे. यावेळी स्वत: एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर धंगेकर यांनी काँग्रेसचा हात सोडल्याने पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.