मुंबई:- विधान परिषदेची पोटनिवडणूक बिनविरोध झाली आहे. पोटनिवडणुकीत ६ पैकी ५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. तर एका अपक्ष उमेदवाराने भरलेला अर्ज बाद ठरला आहे. अपक्ष उमेदवाराकडे आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र आणि नोटरी नसल्याने त्याचा अर्ज अपात्र ठरविण्यात आला. दरम्यान, २० तारखेपर्यंत अर्ज मागे घेण्याचा कालावधी आहे. त्यानंतर निवडणूक अधिकारी अधिकृत घोषणा करतील.
दादाराव केचे, संजय केणेकर, संदीप जोशी, चंद्रकांत रघुवंशी आणि संजय खोडके बिनविरोध निवडून आले आहेत.
यापूर्वी महाराष्ट्र विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून रविवार १६ मार्च रोजी तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यामध्ये नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी, माजी आमदार दादाराव केचे आणि प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर यांना संधी देण्यात आली आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय खोडके यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. संजय खाेडके हे आमदार सुलभा खोडके यांचे पती असून, अजित पवार यांचे निकटवर्ती आहेत.