ACB Trap: कार्यकारी अभियंता, वरिष्ठ सहाय्यक व परिचराला ४ लाख २० हजाराची लाच घेताना अटक

Bhairav Diwase

चंद्रपूर:- जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत जनतेची तहान भागविण्यासाठी ग्रामीण भागात तयार करण्यात आलेल्या नळ पाणी पुरवठा येाजनांच्या केलेल्या कामांचे बिले काढण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, वरिष्ठ सहायक व एका कंत्राटी परिचरला लाचलुचपत विभागाने 4 लाख 20 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक केले.


कार्यकारी अभियंता हर्ष यशोराम बोहरे, वरीष्ठ सहायक सुशील मारोती गुंडावार, परीचर मो. मतीन फारून शेख असे लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांची नावे आहेत. हे तिघेही संशयित आरोपी ग्रामीण पाणी पुरवठा विभागात कार्यरत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात लाचलुचपत विभागाने मोठी कारवाई करून जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्या विरोधात मोठी कारवाई केल्याने जिल्हा परिषद प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

तक्रारदार हे जिवती, जि. चंद्रपूर येथील रहिवासी असून त्यांचा ठेकेदारीचा व्यवसाय आहे. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चंद्रपूर जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाच्यावतीने ग्रामीण भागातील जनतेची तहान भागविण्याकरीता "जल जीवन मिशन" कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे. या कार्यक्रमांतर्गत नळ पाणी पुरवठा योजना निर्माण केल्या जातात. याच कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील जिवती आणि राजुरा येथील तालुक्यात २३ गावांमध्ये नळ पाणीपुरवठा योजनांची कामे केली. त्यापैकी १० गावांतील नळ पाणी पुरवठा योजनांचे कामांची बिले ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर येथे मंजुरीकरीता सादर केले होते. त्यांपैकी 5 गावांचे कामांचे एकूण ४३ लाख रुपयांचे बिले तक्रारदारास प्राप्त झाले.

सदर बिले व बाकी असलेली बिले काढून देण्याकरिता कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे यांनी स्वतःकरीता ४ लाख रूपयांची मागणी केली. ही रक्कम त्यांचे वरिष्ठ सहायक सुशील गुंडावार यांच्याकडे देण्यास सांगितले. तसेच वरिष्ठ सहायक सुशील गुंडावार यांनी स्‍वत:करीता २० हजार रूपयांची मागणी केली. असे दोघांचे मिळून एकूण ४ लाख २० हजार रूपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी, बोहरे, सुशील गुंडावार, यांना ४ लाख २० हजार रूपये लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांच्या दोघांच्या विरोधात लाचलुचपत विभाग चंद्रपूर येथे तक्रार दाखल केली.

सदर तक्रारीच्या अनुषंगाने, दिनांक ०७ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२५ रोजी करण्यात आलेल्या तक्रारीची पडताळणी केली असता कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे, वरिष्ठ सहायक सुशील गुंडावार यांनी तक्रारदार यांना ४ लाख २० हजार रूपये लाचेची मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शविली. त्यावरून काल दिनांक १० एप्रिल २०२५ रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान आलीसे क्र. २ सुशील गुंडावार यांनी लाचेची रक्कम ४ लाख २० हजार रूपये स्वतः स्विकारून त्यापैकी २० हजार रूपये स्वतः करीता वेगळे काढून उर्वरीत ४ लाख रूपये संशयित आरापी मतीन शेख यांना कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे यांना देण्यास सांगितले.

त्यांनी सुशील गुंडावार यांच्या सांगण्यावरून कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे यांच्या घरी नेऊन दिले. सदरची लाच रक्कम लाच स्विकारणारे लाचखोर संशयित आरोपी कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे, वरिष्ठ सहायक सुशील गुंडावार यांना ताब्यात घेण्यात आले. तर सदर दोन्ही संशयित आरोपींना लाचेची रक्कम नेऊन देण्यास मदत करणारा संशयित आरोपी कंत्राटी परिचर मो. मतीन फारून शेख यालाही ताब्यात घेण्यात आले. तिघांच्याही विरोधात रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

केंद्र व राज्य शासनाच्यावतीने ग्रामीण भागातील नागरिकांना 55 लिटर प्रमाणे प्रती मानसी प्रती दिन शुध्द स्वच्छ व गुणवत्तपूर्ण पाणी पुरवठा करण्याचे ध्येय आहे. या करीता ग्रामीण भागात नळ पाणी पुरवठा योजनेव्दारे तहान भागविली जाणार आहे. परंतु अधिकारीच या योजनांना पोखरण्याचे काम करीत असतना चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यांच्या विरोधात लाचलुचपत विभागाने केलेल्या मोठ्या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

ही कारवाई लाचलुक्पत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक सचिन कदम, अपर पोलीस अधीक्षक संजय पुरंवरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप अधीक्षक श्रीगाली मंजुषा भोसले, सहकारी पोलिस कर्मचारी. जितेंद्र गुरुनुले, हिवराज नेवारे, नरेशकुमार नन्नावरे, रोशन चांदेकर, अमोल सिडाम, प्रदीप ताडाम, वैभव गाडगे, पुष्पा काचोळे, सतिश सिडाम, संदिप कौरासे यांनी केली आहे.