चंद्रपूर:- भाजपमधील अंतर्गत कलह चंद्रपूरच्या राजकारणात आता रोजचाच चर्चेचा विषय झाला आहे. त्याला कारण विधानसभा निवडणूक पूर्वी भाजपा एक मंच, एक कार्यक्रम असा उपक्रम होता. आता एक कार्यक्रम, दोन मंच असा नित्यक्रम सुरू झाला आहे.
12 एप्रिलला माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पंचमुखी हनुमान मंदिर येथे भक्तनिवास चे लोकार्पण केले. त्याच भक्त निवासाचे लोकार्पण आ. किशोर जोगेवार यांच्या हस्ते 13 एप्रिल रोजी लोकार्पण पार पडले.
या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षात सुरू झालेले राजकीय शीतयुद्ध आता उघड संघर्षात परावर्तित झाला आहे. याचं ताजं उदाहरण म्हणजे घुग्घूस परिसरातील पांढरकवड्यातील पंचमुखी हनुमान मंदिर, जिथं एका 'भक्तनिवास'साठी दोन स्वतंत्र लोकार्पण समारंभ आयोजित करण्यात आले. एक अधिकृत, आणि दुसरं 'राजकीय धक्का'! सुमारे १.५ कोटींच्या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाने उभारलेला हे भक्त निवास आहे.
दरम्यान मुनगंटीवार यांनी शनिवार १२ एप्रिल रोजी लोकार्पण केल्यानंतर किशोर जोगेवार यांनी रविवारी १३ एप्रिल रोजी या भक्त निवासाचे लोकार्पण केले.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने आमंत्रण पत्रिका छापण्यात आली असून, पालकमंत्री अशोक उईके उद्घाटक, तर दोन खासदार आणि आठ आमदार प्रमुख पाहुणे म्हणून नमूद होते. पंचमुखी हनुमान मंदिर परिसरातील भक्तनिवास हे आता सत्तासंघर्षाचं मैदान झालं. जनसेवेच्या नावाने उभारलेली ही वास्तू आता सत्ताकांक्षा आणि वर्चस्वाच्या लढाईचं प्रतीक बनली आहे. मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यातील जुना वाद पुन्हा एकदा चिघळला आहे. राजकीय वर्तुळात याला भाजपमधील "सत्ता संघर्ष" आणि "वर्चस्व युद्ध" असे संबोधले जात आहे.
भक्तनिवासावर झालेलं 'डबल उद्घाटन' स्पष्टपणे दाखवतं की भाजपमधील अंतर्गत फाटाफूट आता नियंत्रणाबाहेर जात आहे. धर्म आणि विकासाच्या नावाने सुरू झालेली ही राजकीय स्पर्धा दाखवते की निवडणूक संपल्यानंतरही सत्तेची भूक शमलेली नाही. आता पाहावं लागेल की भाजपचं केंद्रीय नेतृत्व या 'हनुमान स्थळा'तून उठलेल्या वादळाला कसं शांत करतं. की हे प्रकरण पक्षासाठी आणखी एक डोकेदुखी ठरणार? एक प्रश्न जनतेतून उठतोय.