चंद्रपूर:- शैक्षणिक, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे येथील सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर यांना नागपूर येथे झालेल्या सोहळ्यात राज्याचे अर्थ व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते 'विदर्भ भूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे जन्मलेल्या प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर यांची कर्मभूमी गडचिरोली व चंद्रपूर राहिली आहे. ते चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयात शारीरिक शिक्षण विभागात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्यानंतर प्राचार्य म्हणून त्यांनी २००६ ते २०२० पर्यंत अहेरी येथील एस.पी. कला वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम केले. त्यांच्याजवळ शैक्षणिक कार्यकाळातील ३४ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यात १९ वर्षांहुन अधिक वर्ष ते प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत हे विशेष. विद्यापीठ स्तरावर त्यांना ३४ वर्षांहून अधिक वर्षांचा प्रशासकीय अनुभव आहे. त्यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या प्राचार्य विभागातून सिनेट व व्यवस्थापन परिषद या प्राधिकरणावर कार्य केले आहे.
गोंडवाना विद्यापीठाच्या ४५ विविध समित्यांवर अध्यक्ष व सदस्य म्हणून ते कार्यरत होते. सध्या ते गोंडवाना विद्यापीठाच्या अँकॅडमिक कॉन्सिलचे सदस्य आहेत. गोंडवाना विद्यापीठाच्या प्राचार्य फोरमचे ते अध्यक्ष आहेत. त्यांचे आंतरराष्ट्रीय संशोधन मासिकात २३, तर राष्ट्रीय संशोधन मासिकात २५ पेपर प्रकाशित आहेत. त्यांनी ३५ विविध आंतरराष्ट्रीय परिषदेत भाग घेतला असून अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन देखील केले आहे. आपल्या कार्यातून त्यांनी ठसा उमटविला आहे. त्याची दखल घेत त्यांना उत्कृष्ठ प्राचार्य, उत्कृष्ठ कार्यकारी अधिकारी व राज्य स्तरावरील उत्कृष्ठ नाट्य दिग्दर्शनाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.डॉ. काटकर यांनी क्रीडा क्षेत्रातील मोलाचे योगदान दिले असून ११ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रतिनिधित्व केले आहे हे उल्लेखनीय.
शैक्षणिक, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर यांना नागपूर येथे पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात पार्थशर समाचार, देशोन्नती व 'बीसीएन नेटवर्क' च्या वतीने 'विदर्भ भूषण' पुरस्काराने राज्याचे अर्थ व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणाताई तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य, राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर, जिनेश पटेल यांच्यासह महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.