चिमूर:- पाणी आणण्यासाठी गेलेल्या एका महिलेला रस्त्याने जाणाऱ्या क्रेनने चिरडल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. शारदा मधुकर डांगे (वय ५८) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना रविवारी (दि.१३) सकाळी ९.३० च्या सुमारास घडली. घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी तब्बल चार तास मार्ग रोखून धरला तसेच एका पिकपला पलटी केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, चिमूर तालुक्यातील भिशी ते जांभूळघाट मुख्य मार्गावर आंबेनेरी गाव आहे. आज (रविवारी) सकाळी वृद्ध महिला हात पंपावर पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेली होती. दरम्यान पाणी घेऊन येत असताना त्याच मार्गाने येणाऱ्या क्रेनने धडक दिल्याने क्रेनच्या मागच्या चाकात सापडून महिलेचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. ज्या क्रेनमुळे अपघात घडला तो क्रेन गोसीखुर्द उपकालव्याच्या कामावरील असून घटनेनंतर क्रेन चालक पळून गेला त्यामुळे जमाव अधिकच आक्रमक झाला.
घटनेनंतर जमावाने मार्ग रोखून धरल्याने मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. काही वेळात गोसेखर्द उप कालव्यावरील पिकअप वाहन त्या मार्गावरून आले. त्यामुळे आक्रमक झालेल्या गावकऱ्यानी वाहन पलटी केले. चालकाला घटनास्थळी आणल्याशिवाय मृतदेह रस्त्यावरून हलविणार नाही, असे म्हणत गावकऱ्यांनी मृतदेह चार तास रस्त्यावर ठेवला. भिशी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक घटनास्थळी आल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. त्यानंतर दुपारी एकच्या सुमारास शव विच्छेदन करण्यासाठी चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह पाठविण्यात आले. पुढील तपास भिसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र चांदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शुभांगी पाटील करीत आहेत.