ब्रम्हपुरी:- मोहफूले वेचायला गेलेल्या एका साठ वर्षीय व्यक्तीचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी ( दि. 13 एप्रिल) ला ब्रह्मपुरी तालुक्यातील चिचखेडा येथे उघडकीस आली आहे.
विनायक विठोबा जांभुळे असे मृतकाचे नाव आहे. शनिवारी याच तालुक्यातील नांदगाव जानी शेतशिवारात एका बिबट्याने तीन शेतकऱ्यावर हल्ला करून जखमी केल्याची घटना ताजी असताना आज साठ वर्षीय व्यक्तीचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला.
दरवर्षी मोह फुले वेचणीचा हंगामी सीजन येतो. या योजनांमध्ये गोर गरीब व्यक्ती गावालगत च्या जंगलामध्ये जाऊन मोह फुले गोळा करतात. त्यापासून मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नावर संसाराचा उदरनिर्वाह करतात. याच उद्देशाने आज रविवारी चिचखेडा येथील 60 वर्षीय विनायक जांभळे हा व्यक्ती परिसरातील जंगलात मोहफुले वेचण्यासाठी गेला होता. मोहफुले वेचत असताना जंगलात दबा धरून असलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला चढविला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. तो घरी परत न आल्यामुळे कुटुंबियांना शंका आली. त्यांनी शोधाशोध केली असता या वृद्धाचा मृतदेह कक्ष क्रमांक 1006 मधील जंगलात आढळून आला.
या घटनेची माहिती वन व पोलीस विभागाला देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि उत्तरीय तपासणी करिता ब्रह्मपुरी येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये पाठविण्यात आला. चिचखेडा गाव मेंडकी पासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर आहे. मृतक हा चिचखेडा येथील होता. या घटनेने चिचखेडा परिसरात पुन्हा दहशत निर्माण झाली आहे