Jan Vikas Sena Aggressive: आयुक्तांच्या गाडीवर उधळल्या 'नोटा'!

Bhairav Diwase

चंद्रपूर:- 'मेन रोड तो झाकी है, पुरा शहर खोदना बाकी है', असा खोचक नारा देऊन जनविकास सेनेने येथील मनपा इमारतीसमोर उभ्या असलेल्या आयुक्त विपिन पालीवाल यांच्या चारचाकी वाहनावर खेळण्यातील नकली नोटांची उधळण केली.


जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी एका लाल ब्रिफकेसमध्ये आणलेल्या या नकली नोटा आयुक्ताच्या वाहनावर उधळल्या. मर्जीतील कंत्राटदाराच्या हितासाठी मनपातर्फे 506 कोटी रुपयांची नविन भुमिगत गटार योजना केली. या योजनेसाठी केवळ मुख्य रस्तेच नाही, तर संपूर्ण शहरातील रस्ते पुन्हा एकदा खोदण्यात येतील असा जनविकास सेनेचा आरोप आहे.

नवीन गटार योजनेच्या खोदकामाला तातडीने स्थगिती देण्यात यावी व या योजनेच्या निविदा प्रक्रियेतील 50 कोटी रुपयांच्या व्यवहाराची चौकशी करण्यात यावी तसेच 15 वर्षांपूर्वी काम झालेल्या 100 कोटी रुपयांच्या जुन्या भूमिगत गटार योजनेचे काय झाले, 234 कोटी रुपयांची पहिली अमृत पाणीपुरवठा योजना व मनपातील इतर सर्व घोटाळ्यांची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठवणार एक लाख स्वाक्षरींचे पत्र

जनविकास सेनेने शुक्रवारी शहरातील गांधी चौकातून महास्वाक्षरी अभियानाची सुरुवात केली. गोल बाजार व मुख्य रस्त्यावरील दुकानातही स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. पहिल्या दिवशी 1 हजारच्या जवळपास नागरिकांनी या महा-स्वाक्षरी अभियानात भाग घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शहरातील एक लाख नागरिकांच्या सह्यांचे पत्र पाठवण्यात येईल. पुढील काही दिवस संपूर्ण शहरात पदयात्रा व कॉर्नर सभा घेऊन एक लाख सह्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती यावेळी देशमुख यांनी दिली. या अभियानासाठी मनिषा बोबडे, अक्षय येरगुडे, निर्मला नगराळे, प्रफुल बैरम, इमदाद शेख, अजित दखने, दिलीप होरे, सुरेश विधाते, किशोर जामदार, अशोक दिघीकर आदींनी परिश्रम घेतले