Bank of Maharashtra: महाराष्ट्र बँकेला पाऊणे दोन लाखांचा ऑनलाईन गंडा

Bhairav Diwase

सावली:- बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पाथरी येथून जय पवनसूत बचत गट आणि एका ग्राहकाच्या बैंक खात्यातून एकूण १ लाख ७८ हजार ७०० रुपये ऑनलाइन लंपास झाल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी तक्रार करूनही बँकेने पैसे परत मिळवून दिले नाही, असा आरोप ग्राहकांनी शुक्रवारी दि. १६ पत्रकार परिषदेत केला आहे.

सावली तालुक्यातील मुंडाळा येथील १३ व्यक्तींनी २०११ मध्ये जय पवनसूत बचतगट स्थापन केले. अध्यक्ष दामोदर गोबाडे तर जितेंद्र गोबाडे हे सचिव आहेत. बैंक ऑफ महाराष्ट्र पाथरी शाखेत खाते उघडले. १२ मे रोजी या बचतगटाचे १ लाख ७८ हजार ७०० रुपये खात्यातून ऑनलाइन उडविल्याचे उघडकीस आले. गोबाडे यांनी ९ मे रोजी २४ हजार रुपये बँकेत जमा केले असता १ लाख ७८ हजार ८११ रुपये शिल्लक होते. १३ मे रोजी रक्कम काढण्यास गेले असता खात्यात शिल्लक नसल्याची माहिती शाखा व्यवस्थापकांनी दिली. अध्यक्ष गोबाडे त्यांनी पासबुक एंट्री केली असता १२ मे बुद्धपौर्णिमा सुटीच्या दिवशी १ लाख २० हजार रुपये,५८हजार व ७०० रुपये विड्रॉल झाल्याचे आढळून आले. असाच प्रकार मुंडाळा येथील खिनचंद कोकोडे यांच्या बाबतही घडला. याबाबत बँक व्यवस्थापकांकडे तक्रार झाली. मात्र, अद्याप रक्कम परत मिळाली नाही. रक्कम मिळाली नाही तर बँकेसमोर आंदोलन करू, असा इशारा अध्यक्ष दामोदर गोबाडे, सचिव जितेंद्र गोबाडे यांनी दिला आहे. यावेळी भाऊराव भरडकर, गणपती शेंडे, नारायण खोब्रागडे व अन्य उपस्थित होते.

खातेधारकांची रक्कम ऑनलाईन लंपास झाल्याची तक्रार मुख्य कार्यालयास करण्यात आली. त्यामुळे वरिष्ठांकडून आलेल्या सूचनांचे पालन करुन खातेदारांचे समाधान करण्यात येईल. अन्य कुणाची फसवणूक झाली असेल तर अन्य खातेदारांनीही १९३० क्रमांकावर तक्रार दाखल करावी.
मंगेश गणवीर, शाखाधिकारी बैंक ऑफ महाराष्ट्र शाखा, पाथरी

आधार न्युज नेटवर्क/ सौरभ चौधरी, सावली