Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

Bhairav Diwase

मुंबई:- राज्यातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंगळवारी सकाळी १० वाजता हा शपथविधी पार पडला.

धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी भुजबळांना मंत्रीपद देण्यात आलं आहे. त्यामुळं मुंडेंकडं असलेलं अन्न व नागरी पुरवठा खातच भुजबळांना देखील देण्यात येईल अशी चर्चा आहे. भुजबळांच्या मंत्रीपदानंतर आता नाशिक जिल्ह्याकडं चार मंत्रीपदं आली आहेत. यामध्ये दादा भुसे (शालेय शिक्षण), नरहरी झिरवळ (अन्न आणि औषध), माणिकराव कोकाटे (कृषी) आणि छगन भुजबळ यांना मंत्रीपदं मिळाली आहेत.

दरम्यान, भुजबळांना अद्याप अधिकृतरित्या खातं जाहीर झालेलं नसलं तरी मुख्यमंत्री जे खातं देतील ते आपण स्विकारु अशी प्रतिक्रिया मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ यांनी दिली आहे. पण यापूर्वी भुजबळांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपद चांगल्याप्रकारे भूषवल्यानं त्यांच्याकडं हेच मंत्रीपद येण्याची शक्यता आहे.