वरोरा:- मुलीला त्रास देऊ नको म्हणून सासऱ्याने दम दिल्याने रागाच्या भरात जावयाने सासऱ्याचा खून केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यात समोर आली आहे. ही घटना बुधवारी दि.२१ मेला दुपारच्या सुमारास वरोरा शहरातील सरदार पटेल वॉर्ड, वडारपुरा येथे घडली. मुकुंदा हनुमंत देवकर (वय ७०) असे मृत सासऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी दासा लक्ष्मण इटकर (वय ३७, रा. सरदार पटेल वॉर्ड, वरोरा) याला पोलिसांनी अटक केली आहे.
मृत मुकुंदा देवकर हे वरोरा येथील सरदार पटेल वार्डातील वडारपुरा परिसरात राहतात. त्यांना एक मुलगी असून ती आपल्या नवऱ्याबरोबर त्यांच्याकडेच राहत आहे. जावई दासा इटकर ऐतखाऊ होता. काहीच काम करत नव्हता. सतत मुलीशी भांडत असल्याने सासऱ्याने जावयाला मुलीला त्रास देऊ नको म्हणून दम दिला. याचा राग मनात धरून दासा याने सासऱ्याला काठीने बेदम मारायला सुरूवात केली. त्यानंतर गंभीर जखमी असलेल्या मुकुंदा देवकर यांना शेजाऱ्यांनी रुग्णालयात दाखल करण्यााचा प्रयत्न केला, मात्र रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा वाटेत मृत्यू झाला. याप्रकरणी वरोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून दासा इटकर याला अटक करण्यात आली.