Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!

Bhairav Diwase

मुंबई:- राज्यात पावसाचा जोर वाढू लागला असून शनिवारी वीज पडून ९ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चौघांचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर येथे ढगफुटीसदृश पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वीज पडून दोन सख्ख्या भावांसह चारजणांचा मृत्यू झाला असून ७ जण भाजले आहेत.

यश राजू काकडे (वय १४), रोहित राजू काकडे (२१, रा. सारोळा), रंजना बापूराव शिंदे (५०, रा. मोंढा बु.) व शिवराज सतीश गव्हाणे (३१, रा. पिंपळदरी) अशी मयतांची नावे आहेत. परभणी जिल्ह्यातील पिंप्राळा येथे वीज पडून माणिक महादराव मिरासे (४७) यांचा मृत्यू झाला. धुळे जिल्ह्यातील ताजापुरी नथ्थू हरचंद सनेर (६३) तर जळगाव जिल्ह्यात मोहित जगतसिंग पाटील (२५, रा. खेडगाव नंदीचे ता. पाचोरा) व शांताराम शंकर कठोरे (४४, रा. पूर्णाड ता. मुक्ताईनगर) यांचा मृत्यू झाला. तुरखेड (जि. अमरावती)येथील पवन कोल्हे (२५) हा मरण पावला.