चंद्रपूर:- जिल्ह्यातील अनेक सामान्य नागरिक ७% मासिक नफ्याच्या आमिषाने मोठ्या आर्थिक फसवणुकीला बळी पडले असून, हे प्रकरण सध्या जिल्ह्यात गंभीर चिंता आणि अस्वस्थतेचा विषय ठरत आहे. या प्रकरणी गुंतवणूकदारांनी थेट आ. सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन आपबिती मांडली आणि न्यायासाठी मदतीची विनंती केली.
या पार्श्वभूमीवर आ. सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने हे प्रकरण लवकरात लवकर निपटारा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे महामंत्री व माजी जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महामंत्री रामपाल सिंग, मनोज सिंघवी, नम्रता ठेमस्कर, किरण बुटले, उमेश अष्टणकर व भाऊंचे स्वीय सहाय्यक संजय राईंचवार यांच्या शिष्टमंडला पाठवून जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांची भेट घेऊन सदर प्रकरण तातडीने सोडविण्यासाठी संपूर्ण सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले.
यानंतर पोलीस अधीक्षकांनी गुंतवणूकदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या आणि संबंधित प्रकरणात तत्काळ तपास सुरू करण्याचे आदेश दिले. गुंतवणुकीच्या नावाखाली संजय हांडेकर (रा. सिंदेवाही) आणि कैलास लांडगे (रा. बाबुपेठ, चंद्रपूर) या दोघांनी प्लॉट विक्री, व्यापार, निधी योजना आदींच्या माध्यमातून अनेक नागरिकांचा विश्वास संपादन केला. प्रारंभी काही महिन्यांपर्यंत व्याज दिल्यानंतर फेब्रुवारी २०२३ पासून त्यांनी व्यवहार बंद करत नागरिकांचे पैसे थांबवले. परिणामी, अनेकांचे आयुष्य आर्थिक संकटात सापडले असून, काहीजण कर्जाच्या ओझ्यामुळे मानसिक तणावात आहेत.
मुमक्का सुदर्शन यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण अत्यंत गंभीर असून, तक्रारदारांनी जे कागदपत्रे सादर केली आहेत, त्यांची पडताळणी करून लवकरात लवकर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच, पीडित गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे.
या त्वरित आणि संवेदनशील हस्तक्षेपाबद्दल नागरिकांनी आमदार सुधीर मुनगंटीवार आणि पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन व डॉक्टर मंगेश गुलवाडे यांचे मनःपूर्वक आभार मानले असून, या प्रकरणात न्याय मिळेल, अशी आशा व्यक्त केली आहे.