चंद्रपूर:- महाराष्ट्रातील चंद्रपूर शहरात सध्या राजकीय वर्तुळात एक मोठी चर्चा सुरू आहे. निमित्त आहे भाजपचे आमदार बंटी भांगडिया यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात लावण्यात आलेले शुभेच्छा फलक. या फलकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय नेते जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री अशोक उईके, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार आणि भाजप नेते रविंद्र शिंदे यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांचेही फोटो आहेत.
मात्र, या सर्व फलकांवरून एक महत्त्वाचा फोटो गायब आहे – तो म्हणजे माजी मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा. सुधीर मुनगंटीवार यांचा फोटो नसल्यामुळे चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात भाजपमधील अंतर्गत गटबाजीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
आमदार बंटी भांगडिया यांचा वाढदिवस 19 जुलै रोजी आहे. या निमित्ताने शहरात लावण्यात आलेल्या या शुभेच्छा फलकांवर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे फोटो अग्रस्थानी आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, हे फलक पक्षाबाहेरील व्यक्तींनी नव्हे, तर खुद्द जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी लावले आहेत. यामध्ये सुभाष कासनगोट्टूवार, प्रकाश देवतळे, अशोक जीवतोडे, आवेश पठाण आणि आशिष देवतळे, संजय खाटिक यांचा समावेश आहे.
पक्षाच्याच पदाधिकाऱ्यांनी लावलेल्या फलकांवरून सुधीर मुनगंटीवार यांचा फोटो वगळण्यात आल्याने भाजपच्या अंतर्गत गोटात खळबळ उडाली असून, या घटनेने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे कोणती नवी वळणे घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
सुधीर मुनगंटीवार यांचा फोटो का वगळण्यात आला, यामागे नेमके काय कारण आहे आणि याचे राजकीय परिणाम काय होतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. या घटनेवर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.