चंद्रपूर:- बनावट पत्रकार बनून शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणि अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी चंद्रपूरमध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना काल, १६ जुलै २०२५ रोजी लक्कडकोट तपासणी नाक्यावर घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, १६ जुलै २०२५ रोजी दुपारी ३:३० ते ४:३० वाजताच्या सुमारास प्रादेशिक परिवहन विभाग, चंद्रपूर येथील मोटार वाहन निरीक्षक, योगिता अभिजीत राणे या लक्कडकोट तपासणी नाका येथे आपल्या कर्तव्यावर हजर होत्या. त्यावेळी त्यांना वॉकीटॉकीवर माहिती मिळाली की, MH34-BR-1878 या क्रमांकाच्या ग्रे रंगाच्या अर्टिगा गाडीमधील काही व्यक्ती ट्रक चालकांकडून पैसे घेत आहेत.
या माहितीच्या आधारे, फिर्यादी योगिता राणे यांनी संबंधित व्यक्तींना विचारणा केली असता, त्यांनी "आम्ही पत्रकार आहोत, कुठेही फिरू शकतो, काहीही करू शकतो, तुम्ही विचारणारे कोण" असे उद्धटपणे उत्तर दिले. फिर्यादीने त्यांचे ओळखपत्र दाखवण्यास सांगितले असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आणि फिर्यादीला अश्लील शिवीगाळ केली. तसेच, त्यांच्या शासकीय कामात अडथळा आणत "तुम्ही नोकरी कशी करता, हे पाहतो" अशी धमकीही दिली.
या घटनेनंतर, योगिता अभिजीत राणे यांनी विरुर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून, विरुर पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक १०२/२०२५, कलम २२१, २९६, ३५१ (२), ७९ भारतीय न्याय संहिता-२०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राथमिक तपासानुसार, गुन्ह्यातील आरोपींची नावे मयुर अनिल राईकवार आणि अर्जुन उर्फ सन्नी हरविंद्रसिंह धुन्ना, दोन्ही रा. चंद्रपूर असे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास विरुर पोलीस करत आहेत.
नागरिकांना आवाहन:
चंद्रपूर पोलिसांनी सर्व नागरिक, शासकीय व खाजगी अधिकारी आणि ट्रक चालक व मालकांना आवाहन केले आहे की, बनावट पत्रकारांच्या कोणत्याही धमकीला बळी पडून त्यांना खंडणी देऊ नये. अशा प्रकारची कोणतीही घटना घडल्यास त्वरित जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा पोलीस नियंत्रण कक्षाच्या ११२ या क्रमांकावर कॉल करून पोलिसांना माहिती देऊन सहकार्य करावे.