गडचिरोली:- जिल्ह्रातील मुसळधार पावसाळी ऋतुमुळे जिल्ह्रातील नद्यांची जलपातळी मोठ्या प्रमाणावर वाढून पुर येण्याची शक्यता असते. यातच प्रवास करणाऱ्या व्यक्तींना पुलावरुन वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्याने बुडण्याच्या दुर्घटना घडत असतात. याच पार्श्र्वभूमीवर पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांनी सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकेंना सदर दुर्घटनांबाबत उपाययोजना करुन सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. याच अनुषंगाने काल दिनांक 30/06/2025 रोजी पोस्टे कुरखेडा हद्दीतील सती नदीवरील पुलाजवळ तैनात करण्यात आलेल्या बंदोबस्तातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी समयसुचकता दाखवून नदीतील प्रवाहासोबत वाहून जाणाऱ्या नागरिकास बुडण्यापासून वाचविले आहे.
सविस्तर वृत्त असे आहे की, दोन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्रात होणाऱ्या पावसामुळे सती नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ झालेली आहे. तसेच नदीवरील मुख्य पुलाचे बांधकाम सुरु असल्याने पुलाशेजारी तात्पूरत्या स्वरुपात पुल बांधण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने दिनांक 29/06/2025 रोजी पासून सती नदीवरील पुलाच्या ठिकाणी पोलीस स्टेशन कुरखेडा येथील पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. काल दिनांक 30 जून 2025 रोजी सदर पुलावरुन एक इसम नामे अजय बाळकृष्ण रामटेके, वय 40 वर्षे, रा. श्रीराम नगर, कुरखेडा हे त्यांच्या दूचाकी वाहनाने सती नदीवरील पुलावरुन प्रवास करीत असताना नदीच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने अजय रामटेके हे आपल्या दूचाकीसह नदीच्या प्रवाहासोबत वाहून जात होते. याच वेळी सदर ठिकाणी पोलीस बंदोबस्तात तैनात असलेले पोउपनि. दयानंद भोंबे, सफौ/शालिक मेश्राम व पोहवा/शाम शेणकपट यांनी समयसुचकता दाखवित तत्परतेने दोरीच्या सहाय्याने सदर व्यक्तीस पाण्याच्या प्रवाहातून सुखरुपपणे बाहेर काढून त्यास तात्काळ उपजिल्हा रुग्णालय, कुरखेडा येथे दाखल केले.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी श्री. सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. गोकुळ राज जी. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखेडा श्री. रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे कुरखेडाचे पोनि. महेंद्र वाघ यांच्या नेतृत्वात पोउपनि. दयानंद भोंबे, सफौ/शालिक मेश्राम व पोहवा/शाम शेणकपट यांनी केलेली आहे. यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी जिल्ह्रातील सर्व नागरिकांस अशा पुर परिस्थिती वेळी सतर्कतेने सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.