माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची पत्रकार परिषदेत माहिती
चंद्रपूर:- राज्याच्या राजकारणात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार गट) नेते शरदचंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ९ ऑगस्ट रोजी नागपूर येथे 'ओबीसी मंडल यात्रे'चा शुभारंभ होणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून ओबीसी समाजाला शरदचंद्र पवार साहेबांनी आरक्षणासाठी दिलेल्या योगदानाची माहिती प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवली जाईल, अशी माहिती ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अनिल देशमुख यांनी सांगितले की, ९ ऑगस्ट रोजी नागपूर येथून शरदचंद्र पवार स्वतः या यात्रेला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करतील. ही मंडल यात्रा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जाणार आहे. या यात्रेचा मुख्य उद्देश ओबीसी समाजात शरदचंद्र पवार यांच्या सर्वांगीण नेतृत्वाबद्दल नव्याने जागरूकता निर्माण करणे हा आहे. गेल्या काही दशकांमध्ये ओबीसी समाजाच्या हितासाठी आपण (शरदचंद्र पवार गट) आणि विरोधकांनी नेमके काय केले, याचा वस्तुनिष्ठ आणि तुलनात्मक आढावा मांडून समाजात विश्वासार्हता निर्माण केली जाईल, असेही देशमुख म्हणाले.
भाजपाच्या तथाकथित हिंदुत्ववादी अजेंड्यामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षण व सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांना कशाप्रकारे बाधा पोहोचते आहे, याचे ठोस दाखले देऊन भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर उघड केला जाईल, असा आरोपही अनिल देशमुख यांनी केला. या संपूर्ण कार्यक्रमामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि आगामी निवडणुकांमध्ये, विशेषतः शहरी भागात ओबीसी मतदारांना आपल्या बाजूने आकर्षित करता येईल. त्यांचा आत्मविश्वास प्रबळ करता येईल, जे निवडणूक निकालांवर निर्णायक परिणाम करू शकतात, असे देशमुख यांनी नमूद केले.
एकंदरीत, शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वात सुरू होणारी ही मंडल यात्रा महाराष्ट्राच्या राजकारणात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठी चर्चा घडवून आणण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या यात्रेला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे.