राजुरा:- चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सास्ती गावात किरकोळ वादातून एका भावाने आपल्या मोठ्या भावाची हत्या केल्याची घटना १५ जुलै रोजी उघडकीस आली. याप्रकरणी राजुरा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतकाचे नाव मारोती भाऊजी भिवनकर (वय ४५) असून, आरोपी त्याचे लहान भाऊ दत्तू भाऊजी भिवनकर (वय ४०) आहे.
सविस्तर वृत्त असे की, १५ जुलै रोजी घरात कोणी नसताना या दोन्ही भावांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. रागाच्या भरात लहान भाऊ दत्तूने लाकडी दांड्याने मोठा भाऊ मारोतीच्या डोक्यावर जोरदार वार केला. हा वार इतका गंभीर होता की, मारोती जागेवरच कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
घरी परतल्यावर बहिणीला मारोती रक्तबंबाळ अवस्थेत दिसला. तिने तात्काळ राजुरा पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच राजुरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, मारोतीची हत्या केल्यानंतर आरोपी दत्तू घटनास्थळावरून फरार झाला होता.
राजुरा पोलिसांनी या प्रकरणी तातडीने तपास करत आरोपी दत्तूला अटक केली आहे. किरकोळ वादातून घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने सास्ती गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. राजुरा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.