Click Here...👇👇👇

Student suicide : 'आई-बाबा माफ करा, मला नाही झेपणार‌' ; आत्महत्यानं खळबळ

Bhairav Diwase


नागपूर:- इच्छा नसतानाही ते पालकांच्या अपेक्षांचे ओझे वाहत होते. परंतु अपेक्षांचे ओझे त्यांना पेलवणार की नाही, याची पालकांना जाणीवच नव्हती. विद्यार्थ्यांना पालकांच्या अपेक्षांचे ओझे पेललेच नाही. अभ्यासाच्या तणावातून त्यांनी जीवनप्रवास संपविला. पहिली घटना अंबाझरी, तर दुसरी एमआयडीसी ठाण्याअंतर्गत घडली. या दोन घटनांमुळे पालकांच्या वाढत्या अपेक्षांवर विचार करण्याची वेळ आली आहे. ख्वाहिश देवराम नागरे (16) आणि वैदेही अनिल उईके (17) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत.


आई-बाबा मला माफ करा, मला नाही झेपणार. दीड आठवड्यांपासून वाटत होते, मी नाही करू शकणार. मला प्रत्येक गोष्ट वेळेत देण्यासाठी धन्यवाद. माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे. मात्र आता माझ्याने नाही झेपणार, असे सुसाईड नोटमध्ये लिहिले होते. पत्र वाचून इतर विद्यार्थ्यांना धक्का बसला.


ख्वाहिश हा मूळचा मध्यप्रदेशातील बालाघाट येथील रहिवासी होता. तो नीटची तयारी करण्यासाठी नागपुरात आला होता. गोकुळपेठच्या कॅनल रोडवरील एका कोचिंग सेंटरच्या वसतिगृहात राहत होता. सोमवारी दुपारी ख्वाहिशने आपल्या वर्गमित्रांसोबत भोजन केले आणि खोलीत गेला. बराच वेळ होऊनही तो खोलीतून बाहेर न आल्यामुळे मित्र त्याच्या खोलीकडे गेले. दार आतून बंद होते. त्यांनी ख्वाहिशला आवाज दिला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. मित्रांना चिंता वाटू लागली. सर्वांनी मिळून खोलीचे दार तोडले. आत जाऊन पाहिले असता ख्वाहिश गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. अंबाझरी पोलिस घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला. पोलिसांना खोलीत एक सुसाईड नोट मिळाली. सांगण्यात येते की, ख्वाहिश अभ्यासामुळे 4 दिवसांपासून तणावात होता. वर्गात शिक्षक जे शिकवीत होते, ते सर्व त्याच्या डोक्यावरून जात होते. त्याने याबाबत मित्रांनाही सांगितले होते. त्याने आई-वडिलांनाही याबाबत माहिती दिली होती आणि शिक्षकांचा सल्लाही घेतला होता. सर्वांनी त्याला अधिक ताण न घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्याने टोकाचे पाऊल उचलले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.


वैदेही करीत होती नीटची तयारी

एमआयडीसी ठाण्याअंतर्गत मंगलमूर्ती कॉलनीत राहणारी वैदेही ही सुद्धा नीटची तयारी करीत होती. तिचे वडील अनिल शहर पोलिसांत कार्यरत आहेत आणि आई गृहिणी आहे. वैदेहीची मोठी बहीण एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. वैदेहीने यापूर्वीही नीटची परीक्षा दिली होती. मात्र स्कोअर कमी आल्याने ती पुन्हा तयारी करीत होती. ती एका शिकवणी वर्गात शिकत होती. ती सुद्धा अभ्यासामुळे तणावात होती. नेहमीप्रमाणे सोमवारी ती शिकवणी वर्गात गेली. सायंकाळी 7 च्या सुमारास घरी परतली. आई-वडील काही कामानिमित्त बाहेर गेले होते. काही वेळाने आई-वडील परतले असता वैदेहीने बरे वाटत नसल्याचे सांगितले. ते तिला उपचारार्थ रुग्णालयात घेऊन गेले. डॉक्टरांनी मानसिक ताणामुळे प्रकृती खालावत असल्याची माहिती दिली. रात्री 11 वाजताच्या सुमारास औषध घेतल्यानंतर आई-वडिलांनी तिला घरी आणले. त्यानंतर वैदेही आपल्या खोलीत गेली. मात्र बराच वेळ होऊनही ती खोलीतून बाहेर आली नाही. त्यामुळे आई-वडिलांनी तिला आवाज दिला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे आई-वडिलांनी भाडेकरूंना मदतीसाठी बोलावले. खोलीचे दार तोडले असता वैदेही पंख्याला साडी बांधून गळफास लावलेल्या अवस्थेत दिसली. आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला खाली उतरवण्यात आले. मात्र तिचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.