मुंबई:- सध्या महाराष्ट्र विधिमंडळाचा पावसाळी अधिवेशन सुरु असून या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरु असून आज विधिमंडळातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधिमंडळातील लॉबीमध्ये बाचाबाचीनंतर मारहाण झाली आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात विधानसभा अध्यक्ष योग्य कारवाई करणार असल्याची माहिती दिली.
तर आता या प्रकरणात राज्याचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी आणि आमदारांसोबत गंभीर गुन्ह्यांचे लोकांना विधिमंडळ परिसरात परवानगी देऊ नये अशी मागणी केली आहे. मुनगंटीवार माध्यमांशी बोलत होते.
माध्यमांशी बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशाचं सत्कार केलेल्या सभागृहात अशी घटना घडते ही गंभीर बाब आहे. या प्रकरणाची चौकशी हक्कभंग समितीला दिली पाहिजे. ज्याने हे कृत्य केले त्यांना प्रत्येक अधिवेशनात तुरूंगात टाकले पाहिजे अशी मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली. तसेच विधान भवनाच्या परिसरात अशा घटना घटने म्हणजे सुरक्षितेचा प्रश्न निर्माण होतो. पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करावी. सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात यावे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि पासेस देताना याबाबतचा विचार करावा. आमदारांसोबत गंभीर गुन्ह्यांचे लोक यायलाच नाही पाहिजे. मुळात गंभीर गुन्ह्यांतील लोकांना निवडणूकीलाच उभं राहता येता कामा नये असा सरकारने कायदा करायला हवा अशी मागणी देखील भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी बोलताना केली.