Click Here...👇👇👇

Sudhir Mungantiwar: “इंग्रजीशिवाय समजतच नसेल, तर अशांना ब्रिटनच्या संसदेत पाठवा”

Bhairav Diwase

मुंबई:- गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात हिंदी भाषेवरून मोठी राजकीय चर्चा, आरोप-प्रत्यारोप व दावे झाल्याचं पाहायला मिळालं. विरोधकांनी या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षांना लक्ष्य करून जोरदार हल्लाबोल केला. पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याचा नियम चालणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. यानंतर अखेर राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने हा निर्णय मागे घेतला. यावरून अजूनही चर्चा चालू असताना आता महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेमध्ये पुन्हा एकदा भाषेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. पण यंदा भाषा इंग्रजी होती!


नेमकं काय घडलं?

विधिमंडळ अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभेत भाजपा आमदार व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. औचित्याचा मुद्दा उपस्थित करताना इंग्रजीतील कार्यक्रम पत्रिकेवर तीव्र आक्षेप नोंदवला. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुधीर मुनगंटीवार यांना समजावून सांगत अशा प्रकारची मागणी सभागृहातील 9 सदस्यांकडून आल्याचं नमूद केलं व मुनगंटीवारांची मागणी फेटाळून लावली.

काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?

सुधीर मुनगंटीवार यांनी औचित्याचा मुद्दा मांडताना कामकाजाची कार्यक्रम पत्रिका इंग्रजीतून देण्यावर आक्षेप घेतला. “महाराष्ट्र विधानसभा नियमांत तरदूद नक्कीच आहे की कामकाज मराठी, हिंदी किंवा इंग्रजीत चालेल. पण साधारणपणे मीही १९९५ पासून या सभागृहात आहे. आपली कार्यक्रम पत्रिका इंग्रदीत मी तरी बघितली नाही”, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. त्यावर समोरच्या बाकांवरून “पहिल्यापासून हे आहे”, असं उत्तर येताच मुनगंटीवार यांनी त्यांनाच सुनावलं.

“ऐकून तर घ्या ना. पहिल्यापासून आहे म्हणजे? सनदी अधिकाऱ्यांना आपण मराठी शिकवायला लावतो. इकडे मराठी अभिजात भाषा करायची आणि मराठी ज्यांना बोलता येत नाही, त्यांना हिंदीची संधी असताना जबरदस्तीने इंग्रजी वापरायला सांगायची. मग हिंदीत बोलावं. कार्यक्रमपत्रिका हिंदीत घ्यावी. हिंदीच्या सक्तीला विरोध करायचा आणि इंग्रजीवर प्रेम दाखवायचं. इंग्रजीला आलिंगन द्यायचं. माझा आक्षेप आहे”, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

“जिथे इंग्रजी शब्द असेल, तिथून काढून टाकावा”

दरम्यान, यावेळी मुनगंटीवारांनी नियमावलीतूनच इंग्रजी शब्द काढून टाकण्याची मागणी केली. “महाराष्ट्र विधानसभा नियम तयार करताना इंग्रजीचा प्रभाव असेल. माझी विनंती आहे. एकदा नियम समितीची बैठक घ्यावी आणि इंग्रजी शब्द जिथे जिथे असेल तो तिथून काढून टाकावा. मराठी शिकलीच पाहिजे. अभिजात भाषा आहे. समजा एखाद्याला खूप अडचण असेल तर हिंदी. पण फारच इंग्रजीशिवाय समजत नसेल तर पासपोर्ट-व्हिसा काढून अशांना थेट ब्रिटनच्या संसदेत पाठवा. ही काय पद्धत आहे?”, अशा शब्दांत मुनगंटीवार यांनी आक्षेप नोंदवला.

“…आता इंग्रजीची भर घालू नका”

सुधीर मुनगंटीवार यांच्या या आक्षेपावर अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी मिश्किल टिप्पणी केली. “सुधीरभाऊ, माध्यमांना हिंदी आणि मराठीबद्दल लिहायला खूप काही आहे. आता तुम्ही त्यात इंग्रजीची भर घालू नका”, असं त्यांनी म्हणताच सभागृहात हास्याची लकेर उमटली.

“नियम २२ नुसार सभागृहात कोणत्या भाषेत चर्चा करता येते हे सगळ्यांना माहिती आहे. त्याप्रमाणे आपण सुरुवातीपासून इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये कामकाज पत्रिका तयार करतो. त्याशिवाय माझ्याकडे कामकाज पत्रिका इंग्रजीत देण्यात यावी अशी ९ सदस्यांची विनंतीही आली आहे”, असं उत्तर राहुल नार्वेकर यांनी दिलं.