चंद्रपूर:- घुग्गुस राजीव रतन चौकातील उड्डाणपुलाचे काम अनेक दिवसांपासून बंद असल्याने, घुग्गुसच्या महिलांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर सुरू व्हावे, या मागणीसाठी त्यांनी १८ जुलै रोजी प्रशासनाला अर्ज सादर केला होता. तसेच रेल्वे फाटक बराच वेळ बंद राहिल्याने होणाऱ्या त्रासाकडेही त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
या कामाला गती न मिळाल्यास ३ ऑगस्ट रोजी चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा महिलांनी दिला होता. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आंदोलन १५ ऑगस्टपर्यंत स्थगित केले. प्रशासनाने १५ ऑगस्टपर्यंत तोडगा काढला नाही, तर १६ ऑगस्ट रोजी चक्का जाम आणि रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा माला मेश्राम व महिलांनी पत्रकार परिषदेद्वारे दिला आहे.
महिलांनी १० ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. मंत्र्यांनी काम लवकर सुरू करण्याचे आश्वासन दिले. परंतु, अद्यापही उड्डाणपुलाच्या कामात कोणतीही प्रगती झालेली नाही. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास महिला १६ ऑगस्ट रोजी आंदोलन करतील आणि काम पूर्ण होईपर्यंत आंदोलन करीत राहणार, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.