चंद्रपूर:- बल्लारपूरचा अल्पवयीन तरुण रणजित निषाद गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता आहे. तो ८ ऑगस्ट रोजी रात्री आपल्या मित्रांसोबत राजुरा तालुक्यातील गौरी सास्ती परिसरात गुप्ता कोळसा वॉशरी येथे फिरायला गेला होता, पण त्यानंतर तो परत आला नाही. यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्यासोबत काहीतरी अनुचित प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला आहे.
रणजितच्या आई-वडिलांनी आज पत्रकार परिषद घेऊन पोलिसांकडे आपल्या मुलाचा शोध घेण्याची मागणी केली. जर पोलीस त्याचा शोध घेऊ शकत नसतील, तर या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
रणजितचे वडील दिनेश निषाद आणि आई राजाराणी यांनी सांगितले की, रणजित आणि त्याचे ७ मित्र रात्री ११.३० वाजता बाहेर गेले होते. दुसऱ्या दिवशी राजुरा पोलिसांनी रणजितसोबतच्या काही मित्रांना चोरीच्या आरोपाखाली अटक केली. मात्र, या अटकेत रणजित नव्हता. रणजितचा मोबाईल फोन त्याच्या मित्रांपैकी एकाकडे, दाऊद नावाच्या मुलाकडे सापडला. यामुळे त्यांच्या मित्रांनीच रणजितसोबत काहीतरी चुकीचे केले असावे, असा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.
या पत्रकार परिषदेला रणजितचे आई-वडील, भाऊ संजय निषाद यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलावर, जनहित जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे आणि इतर अनेक सदस्य उपस्थित होते.
कुटुंबीयांनी पोलिसांना या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेऊन रणजितचा त्वरित शोध घेण्याची विनंती केली आहे, अन्यथा सीआयडी चौकशीची मागणी कायम राहील, असे सांगितले.