चंद्रपूर:- चंद्रपूर: महाराष्ट्र शासन आणि कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (KPCL) यांच्यात २०१६ साली झालेल्या करारानुसार प्रकल्पग्रस्त युवकांना तांत्रिक आणि व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचं आश्वासन अद्यापही पूर्ण झालेलं नाही. यामुळे स्थानिक युवकांना केवळ कमी पगाराच्या नोकऱ्यांवर समाधान मानावं लागत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा अभियंता सेल, महाराष्ट्रचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य इंजिनि. जगदीश लवाडिया यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन आयटीआय आणि व्होल्वो प्रशिक्षण त्वरित सुरू करण्याची मागणी केली आहे.
१५ डिसेंबर २०१६ रोजी झालेल्या करारानुसार, प्रकल्पग्रस्त युवकांच्या कौशल्य विकासासाठी १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, तब्बल सात वर्षांहून अधिक काळ उलटूनही या निधीचा योग्य वापर झालेला नाही. याचा परिणाम म्हणून स्थानिक तरुण व्हॉल्वो टिपर ऑपरेटर, एक्स्कॅवेटर ऑपरेटर, मायनिंग इंजिनिअर यांसारख्या कुशल पदांपासून वंचित राहत आहेत. या पदांवर बाहेरील व्यक्तींना प्राधान्य दिलं जात असल्याचं लवाडिया यांनी निवेदनात म्हटलं आहे.
ऑक्टोबर २०२३ रोजी नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत KPCL ने आयटीआयसाठी १० लाख रुपये आणि इतर विकासकामांसाठी जवळपास ७८ लाख रुपये जिल्हा प्रशासनाकडे जमा केल्याची माहिती दिली होती. तरीही, अद्याप आयटीआयचं बांधकाम सुरू झालेलं नाही किंवा कौशल्य विकासाचं प्रशिक्षणही सुरू झालेलं नाही.
लवाडिया यांनी आपल्या निवेदनातून तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत:
1) आयटीआयचं बांधकाम आणि कार्यान्वयन तातडीने पूर्ण करावं.
2) प्रकल्पग्रस्त युवकांसाठी व्हॉल्वो टिपर, एक्स्कॅवेटर आणि खाणकाम यंत्रसामग्रीचं प्रशिक्षण त्वरित सुरू करावं.
3) करारातील तरतुदीनुसार, कुशल आणि तांत्रिक पदांवर स्थानिक युवकांना प्राधान्य द्यावं.
या मागण्यांकडे तातडीने लक्ष देऊन प्रकल्पग्रस्त युवकांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा इंजि. लवाडिया यांनी व्यक्त केली आहे.