Food poisoning: चंद्रपूर जिल्ह्यात विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा!

Bhairav Diwase
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील ‌चिमूर येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या जांभुळघाट येथील आदिवासी शासकीय आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेतील एकूण ५३८ विद्यार्थ्यांपैकी २६७ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा आरोप आदिवासी संघर्ष समितीने केला आहे. या घटनेमुळे शाळेतील ९ विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी चिमूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


या आश्रमशाळेत एकूण ५३८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. काल रात्री जेवणानंतर काही मुलांना अस्वस्थ वाटू लागले. आज सकाळी या विद्यार्थ्यांमध्ये रक्ताच्या उलट्या, हातापायांना सूज येणे आणि चक्कर येणे अशी लक्षणे दिसू लागली, ज्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.


घटनेची माहिती मिळताच आदिवासी संघर्ष समितीच्या सदस्यांनी शाळेला भेट देऊन चौकशी केली. या प्राथमिक चौकशीत विद्यार्थ्यांना शिळे अन्न देण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, विद्यार्थ्यांना नेमका कशाचा त्रास झाला, याचा शोध घेतला जात असून त्यांच्या विविध वैद्यकीय तपासण्या सुरू आहेत. आदिवासी विकास विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.