चंद्रपूर:- जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख वाढत असतानाच, एका तरुणाच्या हत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारी थांबायचं नाव घेत नाहीये. प्रशासनासाठी ही एक मोठी चिंतेची बाब बनली आहे.
जुना वाद, तरुणाची हत्या :
कोरपना तालुक्यात एका २४ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याचं उघड झालं आहे. विश्वास नरेंद्र मालेकर (वय २४) असं या मृत तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी आरोपी सुनील पवार (वय २३, रा. पारधीगुडा) यास अटक केली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
परिसरात एक बेवारस मृतदेह पडलेला असल्याची माहिती कोरपना पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोलीस आल्यानंतर त्यांना शंका आली. त्यांनी तपासाची चक्रे फिरवली असता पोलिसांच्या तपासात ही हत्या असल्याचं समोर आलं. जुन्या वादातून ही हत्या झाली होती. मृतक आणि आरोपी यांच्यात वादावादी झाली. यातूनच आरोपीने मारहाण केली. झटापटीत आरोपीने जोरदार धक्का दिल्याने विश्वास मालेकर जमिनीवर कोसळला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिथेच पडून त्याचा मृत्यू झाला.
पोलीसांनी कारवाई:
या प्रकरणी कोरपना पोलिसांनी आरोपी सुनील पवार यास अटक केली आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे करण्यात आलं. या घटनेचा पुढील तपास एसडीपीओ रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, पीआय सुनील गाडे यांच्या नेतृत्वात पीएसआय देवानंद केकन, साईनाथ जायभाये, प्रभाकर जाधव हे करीत आहेत.