चंद्रपूर:- आज चंद्रपूरमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनसंवाद कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांच्या समस्या ऐकण्याऐवजी भाजप कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळा पार पडला आणि मंत्री बावनकुळे यांनी नागरिकांशी संवाद न साधताच काढता पाय घेतला. आम आदमी पार्टीने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.
आज राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यातील शेकडो नागरिक मोठ्या आशेने आले होते, पण त्यांची निराशा झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांच्या समस्या ऐकण्याऐवजी भाजप कार्यकर्त्यांनी मंत्र्यांचं स्वागत करण्यातच वेळ घालवला. पुष्पगुच्छ, शाल आणि सत्कार सोहळ्यामुळे नागरिकांना आपली बाजू मांडण्यासाठी संधीच मिळाली नाही. आणि सर्वात धक्कादायक म्हणजे, एकही समस्या न ऐकता मंत्री महोदयांनी तातडीने कार्यक्रमस्थळावरून निघून गेले. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या घटनेनंतर आम आदमी पार्टीने या कार्यक्रमाचा तीव्र निषेध केला आहे. आम आदमी पार्टी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी या प्रकाराला जनतेची दिशाभूल म्हटलं आहे. हा प्रकार म्हणजे जनतेची सरळसरळ दिशाभूल आहे. जनसंवाद कार्यक्रम असेल तर तो फक्त नागरिकांसाठी असावा, त्यात राजकीय पक्षाचा सत्कार सोहळा होऊ नये. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना देखील स्पष्ट सूचना करतो की पुढे अशा प्रकारे कार्यक्रम आयोजित होऊ नयेत. जर पुढील वेळी असे झाले तर आम आदमी पार्टी या कार्यक्रमांना बसू देणार नाही व ते उधळून लावतील.
यावेळी आम आदमी पार्टीने दोन महत्त्वाच्या मागण्यांसाठी निवेदनं तयार केली होती. पहिली मागणी होती ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन रद्द करून नागरिकांना बांधकाम परवानगी देण्याची. पक्षाच्या म्हणण्यानुसार, 2020-21 मध्ये झालेला ड्रोन सर्वे चुकीच्या आधारावर झाला आहे. दुसऱ्या मागणीत, भूमीहीन आणि भाडेकरू कुटुंबांना मोफत जागा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
या वेळी आम आदमी पक्षाचे प्रदेश जॉइंट सेक्रेटरी सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजीव कुंडे, महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, संगठन मंत्री संतोष बोपचे, महिला शहर अध्यक्षा ॲड. तबस्सुम शेख, जिल्हा सचिव राजकुमार नागराळे, महानगर उपाध्यक्ष सिकंदर सागोरे, शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष हांडेकर गुरुजी, शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष दीपक बेरशेट्टीवार, विशाल बिरमवार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
तर, एकंदरीत, चंद्रपूरमध्ये जनसंवाद कार्यक्रमाच्या नावाखाली झालेला हा सत्कार सोहळा आणि त्यानंतर मंत्र्यांनी घेतलेली एक्झिट यामुळे नागरिकांचा संताप वाढला आहे.