चंद्रपूर:- सकाळ व गोविंदराव वंजारी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर येथे गुणवंत, पदवीधर, तसेच क्रीडा व सामाजिक क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ दि. १८ सप्टेंबरला आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सेस्टोबॉल आणि सेपक टकरा खेळाडू भैरव धनराज दिवसे याचा सन्मान करण्यात आला. भैरव दिवसे यांना आमदार ॲड. अभिजीत वंजारी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
भैरव दिवसे यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. २०२२ मध्ये बंगळूर येथे झालेल्या सेस्टोबॉल स्पर्धेत त्यांनी कांस्यपदक जिंकणाऱ्या महाराष्ट्र संघात सहभाग होता. तसेच, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या संघातर्फे त्यांनी २०२२-२३ या वर्षात इंफाळ, मणिपूर येथे झालेल्या सेपक टकरा स्पर्धेतही सहभाग घेतला होता.
त्यांच्या या कार्याची दखल घेत सकाळ व गोविंदराव वंजारी फाउंडेशनने त्यांचा सत्कार प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह, चंद्रपूर येथे आयोजित या कार्यक्रमात आमदार ॲड. अभिजीत वंजारी यांच्या हस्ते भैरव दिवसे यांचा गौरव करण्यात आला. या सन्मानामुळे भविष्यातही आणखी चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळेल, अशी भावना भैरव दिवसे यांनी व्यक्त केली. या सत्कार समारंभाला परिसरातील अनेक मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते.


