चंद्रपूर:- फलटण ग्रामीण पोलिसांनी पोलीस पाटील आणि ग्रामस्थांच्या मदतीने केलेल्या एका वेगवान कारवाईत, चंद्रपूर जिल्ह्यातून पळून आलेल्या एका प्रेमी युगुलाला आत्महत्येच्या प्रयत्नापासून रोखण्यात यश मिळवले आहे. प्रेमासाठी जीवन संपवण्याचा इशारा देणाऱ्या या दोघांना वेळोशी-सावंतवाडा डोंगराळ भागातून ताब्यात घेण्यात आले असून, यामुळे एक मोठी दुर्घटना टळली आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागभीड (जि. चंद्रपूर) पोलीस स्टेशनमधून एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल होती. चंद्रपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मुलीला तिच्याच गावातील अतुल उद्धव गायकवाड (वय २९) याने पळवून आणले होते. या दोघांनी विषाच्या बाटलीसह फोटो पाठवून, प्रेमासाठी आपले जीवन संपवत असल्याचा निरोप दिल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले होते. तांत्रिक माहितीच्या आधारे त्यांचे शेवटचे ठिकाण फलटण तालुक्यातील वेळोशी-सावंतवाडा परिसरात असल्याचे निष्पन्न झाले.
माहिती मिळताच, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी तात्काळ सूत्रे हलवली. त्यांनी पोलीस पाटील व्हॉट्सॲप ग्रुपवर माहिती प्रसारित करून, पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र पाटील आणि पोलीस नाईक रणपिसे यांचे पथक तपासासाठी रवाना केले.
या शोधमोहिमेत उपळवे गावचे पोलीस पाटील प्रमोद डफळ, ग्राम सुरक्षा दलाचे कार्यकर्ते, स्थानिक तरुण मित्र आणि कारखाना सुरक्षा अधिकारी यांनी पोलिसांना मोलाची मदत केली. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे, माहिती मिळाल्यानंतर केवळ ३० मिनिटांच्या आत या दोघांना ताब्यात घेण्यात यश आले. त्यांच्याजवळ असलेली विषाची बाटलीही जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांनी दोघांचेही समुपदेशन करून त्यांना आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त केले. या यशस्वी कारवाईबद्दल बोलताना, पोलीस निरीक्षक श्री. सुनील महाडीक यांनी, "पोलीस आणि जनता यांनी एकत्रितपणे आणि वेळेवर काम केल्यास अनर्थ टाळता येतो, याचे हे उत्तम उदाहरण आहे. दोन जीव वाचल्याचे समाधान आहे," अशी भावना व्यक्त केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोषी आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पुढील कायदेशीर कारवाईसाठी चंद्रपूर पोलीस पथक फलटणकडे रवाना झाले आहे.