
चंद्रपूर:- चंद्रपुरातील पठाणपुरा ते भिवापूर वॉर्डला जोडणारा झरपट नदीवरील पूल जोरदार पावसामुळे वाहून गेल्याने, स्थानिक खासदार प्रतिभा धानोरकर यांनी या पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना पत्र पाठवून पुलाची उंची वाढवून नव्याने बांधकाम करण्याची सूचना केली आहे.
हा पूल कोसळल्यामुळे पठाणपुरा आणि भिवापूर या दोन महत्त्वाच्या वॉर्डमधील नागरिकांचा थेट संपर्क तुटला आहे. यामुळे बाबुपेठ आणि भिवापूर वॉर्डमधून पठाणपुरात ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास होत आहे. पायी चालणेही शक्य नसल्यामुळे, नागरिकांची गैरसोय मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
या संदर्भात बोलताना खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, "हा पूल केवळ वाहतुकीसाठीच नाही, तर चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकाली यांच्या यात्रेदरम्यान भाविकांसाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे. या मार्गावरून मोठ्या संख्येने वाहतूक वळवली जाते, त्यामुळे हा पूल तातडीने आणि सुरक्षितपणे बांधणे आवश्यक आहे."
त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि चंद्रपूर शहर महानगरपालिका आयुक्तांना या गंभीर समस्येची दखल घेऊन, युद्धपातळीवर पुलाचे बांधकाम सुरू करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होईल आणि आगामी काळात महाकाली यात्रेदरम्यान कोणतीही अडचण निर्माण होणार नाही.