चंद्रपूर:- गणपती उत्सव व विसर्जन मिरवणुकीच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील 540 व्यक्तींविरूध्द हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शांतता अबाधित रहावी यासाठी या सर्वांवर हद्दपार करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
चंद्रपूर व बल्लारपूर शहरात शनिवार, 6 सप्टेंबर अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन आहे. तर, रविवार, 7 सप्टेंबर रोजी राजुरा, मूल आणि वरोडा येथे आणि 8 सप्टेंबर रोजी भद्रावती, ब्रम्हपुरी येथे गणेश मूर्तीचे विसर्जन होणार आहे. चंद्रपूर जिल्हा, महापालिका व पोलिस प्रशासनाने विसर्जनाची तयारी सुरू केली आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीत शांतता कायम राहावी यासाठी 540 जणांना हद्दपार करण्यात आले आहे.
भारताची राज्यघटना सर्वधर्म, समभाव, धर्मनिरपेक्षता अशी शिकवण देते. मात्र काही समाज विघातक प्रवृत्ती या मूळ संकल्पनेलाच मोडीत काढून देशात अराजकता पसरविण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रवृत्तीला आळा घालून आपली परंपरा, सण-उत्सव उत्साहाने साजरे करणे व त्याचवेळी शांतता, सामाजिक सलोखा, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे फार महत्वाचे आहे. याकरिता पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी आपआपल्या पोलिस ठाणे हद्दीतील शांतता भंग करणार्या एकूण 540 व्यक्तींविरुध्द कलम 163 (2) भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-2023 अन्वये संबंधित पोलिस ठाणे हद्दीत येण्यास मनाई करण्यात यावी म्हणून प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालयात पाठवून 540 व्यक्तींविरूध्द त्यांच्या पोलिस ठाणे हद्दीत येण्यास मनाई (हद्दपार) चा आदेश पारीत करुन घेतला आहे.