गोंडपिपरी:- मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. शासनाने या कामासाठी २४५३.५९ लक्ष (चोवीस कोटी त्रेपन्न लक्ष) रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली आहे, ज्यामुळे आरोग्य सेवेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे.
१९८२ सालापासून गोंडपिपरी आणि परिसरातील नागरिकांची सेवा करणारे हे ग्रामीण रुग्णालय आता जीर्ण झाले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ही इमारत वापरण्यायोग्य नसल्याचे स्पष्ट केले होते, त्यामुळे एका छोट्या खोलीत हे रुग्णालय सुरू होते. ज्यामुळे नवीन इमारतीची गरज तीव्र झाली होती. परंतु, या नवीन इमारतीचा प्रस्ताव प्रलंबित असल्याने कामाला विलंब होत होता.
या प्रस्तावाला गती देण्यासाठी राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे यांनी अथक पाठपुरावा केला. त्यांनी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर पहिल्याच हिवाळी अधिवेशनात दि. १७ डिसेंबर रोजी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर सातत्याने राज्याचे आरोग्यमंत्री ना. प्रकाशजी आबिटकर यांचेकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. याचसंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना त्यांना पत्र देत त्यावर शासनाच्या आरोग्य विभागाने त्वरित कार्यवाही करण्याचा रिमार्क घेतला. त्यानुसार सदर प्रस्ताव उच्चस्तरीय समितीकडे पाठविण्यात आला. यात देखील यशस्वी पाठपुरावा करून त्यांनी या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या या अथक प्रयत्नांमुळेच प्रलंबित असलेल्या या प्रस्तावाला मंजुरी मिळाली.
शासनाने १२ सप्टेंबर रोजी शासन निर्णय काढून गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य इमारतीच्या बांधकामासाठी २४५३.५९ लक्ष रुपयांच्या निधीला (चोवीस कोटी त्रेपन्न लक्ष)* प्रशासकीय मान्यता दिली आहे. हा निर्णय गोंडपिपरीसह परिसरातील नागरिकांसाठी एक मोठी दिलासादायक बाब आहे. यामुळे रुग्णालयाची क्षमता वाढेल आणि आधुनिक सुविधांसह दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होईल.
विधानसभा निवडणुकीत गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयाच्या नविन इमारतीच्या बांधकामाचा मार्ग सुकर करेन आणि तालुक्यातील युवकांच्या हाताला काम मिळण्याकरता गोंडपिपरी एमआयडीसी परिसरात नविन उद्योग निर्मीती करणार असा वादा गोंडपिपरी तालुक्यातील जनतेला आमदार देवराव भोंगळे यांनी केला होता. त्यानुसार निवडून येताच त्यांनी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांना वेळोवेळी भेटून त्यांना यासंदर्भात निवेदने दिली. आमदार देवराव भोंगळे यांच्या निवेदनांची दखल घेत तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. त्यानुसार गोंडपिपरी एमआयडीसी परिसरात वॉव आयर्न अँड स्टील प्रकल्प हा नविन कारखाना सुरू करण्याचा शासनाने करार केला आहे. तर दुसराही सार्वजनिक हिताचा निर्णय घेत ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य इमारतीच्या बांधकामासाठी २४५३.५९ लक्ष रुपयांच्या निधीला (चोवीस कोटी त्रेपन्न लक्ष) प्रशासकीय मान्यता मिळवून दिली.
'महाराष्ट्र आता थांबणार नाही आणि विकास आता लांबणार नाही' हे राज्य शासनाचे ब्रिद वाक्य सत्यात उतरले आहे. अशी भावना व्यक्त करीत या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल आमदार देवराव भोंगळे यांनी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, आरोग्यमंत्री ना. प्रकाशजी आबिटकर आणि या निर्णयाला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत. स्थानिक नागरिकांनीही या कामासाठी केलेल्या यशस्वी पाठपुराव्याबद्दल आमदार देवराव भोंगळे यांचे आभार मानले असून गोंडपिपरीसारख्या ग्रामीण भागासाठी हा निर्णय आरोग्य क्षेत्रातील एक क्रांतीकारी पाऊल मानला जात आहे.