Korpana News: महसूलच्या कामांना मिळणार गती ; मध्यवर्ती स्थानी होणार कार्यालय

Bhairav Diwase

कोरपना:- कोरपना येथे उपविभागीय अधिकारी ( महसूल ) कार्यालय स्थापन करण्यासंदर्भात विभागीय आयुक्त नागपूर यांनी मागवलेल्या माहितीवरून कोरपना व जिवती तहसीलदारांनी बावीस विवरणाची माहिती सादर केली आहे.
यात तालुक्याची लोकसंख्या, एकूण गावे, साझे, महसुली मंडळ, भौगोलिक क्षेत्र, लोकसंख्या, आदिवासी लोकसंख्या, एकूण खातेदार, जमीन महसूल, मुख्यालय ठिकाण, मुख्यालयाचे अंतर, दळणवळणाची साधने, ग्रामपंचायत संख्या, विधानसभा लोकसभा मतदारसंघ तपशील, स्थानिक स्वराज्य संस्था तपशील, आदिवासी डोंगरी क्षेत्र, ऐतिहासिक धार्मिक पर्यटन, मध्यवर्ती स्थान, उपलब्ध इमारत, जागा , मुख्यालय ठिकाणी असलेली इतर कार्यालय, वाहन उपलब्धता तपशील सह अभिप्राय असे 22 मुद्द्याची विवरणात्मक माहिती दोन्ही तहसीलदारांनी उपविभागीय अधिकारी राजुरा यांचे मार्फत पाठविली.


राजुराचे आमदार देवराव भोंगळे यांचे नेतृत्वात भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने व नागरिकांनी ही मागणी महसूल मंत्री महाराष्ट्र शासन यांना लेखी निवेदनाच्या माध्यमातून केली होती. त्यावर सकारात्मक पावले उचलत ही माहिती मागविण्यात आली. त्यामुळे कोरपना येथे दोन्ही तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी महसूल कार्यालय ची निर्मिती होण्यासाठी मार्ग सुकर झाला आहे. याचा फायदा दोन्ही तालुक्यातील महसूल विषयक कामे जलद गतीने होण्यासाठी होईल.


कोरपन्यात उपविभागीय स्तरावरचे होणार चौथे कार्यालय

कोरपना येथे जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, जिल्हा परिषद पाणीपुरवठा उपविभाग , उपविभागीय डाक निरीक्षक ही तीन उपविभागीय स्तरावरील कार्यालय कोरपना, जिवती दोन्ही तालुक्यांसाठी कार्यरत आहे. उपविभागीय अधिकारी महसूल कार्यालय स्थापन झाल्यास चौथे उपविभाग कार्यालय कोरपना शहरात उपलब्ध होईल. तर जिल्ह्यात हे नववे उपविभागीय अधिकारी महसूल कार्यालय असेल.

कोरपना येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय स्थापन करण्यासंदर्भात कोरपना व जिवती तहसीलदार यांनी सकारात्मक अहवाल पाठवलेला असून,सदर ठिकाणी कार्यालय झाल्यास दोन्ही तालुक्यातील नागरिकांना प्रशासकीय काम करण्यास सोयीचे होईल.
आशिष ताजने
जिल्हा उपाध्यक्ष भाजयूमो, चंद्रपूर