Murder News : संशयाने केला घात, घनदाट जंगलात पत्नीची गळा दाबून पतीने केली हत्या

Bhairav Diwase
गडचिरोली:- चारित्र्यावर संशय घेत पत्नीशी नेहमी भांडण करणाऱ्या पतीने अखेर जंगलात गळा दाबून पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना कोरची तालुक्यातील सोनपूर गावाजवळ उघडकीस आली. पत्नीला माहेरी सोडायला जाताना वाटेत वाद विकोपाला गेला अन् पतीने हे थराराक कृत्य केले. या प्रकरणी आरोपी पतीस कोटगुल पोलिसांनी ५ सप्टेंबर रोजी अटक केली आहे.


टामिनबाई पुरुषोत्तम कचलाम असे मृत पत्नीचे तर पुरुषोत्तम गजराज कचलाम रा. सोनपूर, ता. कोरची) असे आरोपी पतीचे नावे आहे. टामिनबाई हिचे माहेर छत्तीसगडचे आहे. या दाम्पत्याच्या लग्नाला दहा वर्षे झाली होती. मात्र, पुरुषोत्तम हा सतत तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन वाद घालत असे.


३१ ऑगस्ट रोजी पुन्हा पती-पत्नीमध्ये वाद झाला. १ सप्टेंबर रोजी आरोपीने पत्नीला माहेरी सोडण्यासाठी पायी निघाले असता सोनपूर-गोडगुलदरम्यानच्या कामेली जंगल परिसरात पुन्हा भांडण झाले. संतापाच्या भरात आरोपीने पत्नीच्या छातीवर बसून गळा दाबून तिचा खून केला. मृतदेह तेथेच सोडून तो गावात परतला. दारूच्या नशेत पत्नीचा खून केल्याची कबुलीही दिली.


या घटनेची माहिती मृतकाची आई चमरीबाई बोगा (रा. चौकी, जि. मानपूर-मोहला, छत्तीसगड) यांना ३ सप्टेंबर रोजी मिळाली. त्यांनी कोटगुल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. आरोपीस सोनपूर येथील शेतातून अटक करण्यात आली. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा अधिक तपास कुरखेडा उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कोटगुल स ठाण्याचे प्रभारी कृष्णा सोळुंके करीत आहेत.