सिंदेवाही:- सिंदेवाही पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मोहाळी गावात मध्यरात्री झालेल्या थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. राजू आनंदराव सिडाम (वय ३५, रा. मोहाळी) याचा अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने गळा कापून खून केला. ही घटना शुक्रवारी (दि.१९) सकाळी उघडकीस आल्याने गावात प्रचंड खळबळ उडाली आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू सिडाम हा घरी एकटा असताना अज्ञात इसम मध्यरात्री त्याच्या घरी गेला. त्यानंतर त्याने गळा कापून त्याचा खून केला. सकाळी रक्ताच्या थारोळ्यात त्याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला.