छत्तीसगड:- छत्तीसगडमधील गारियाबंद जिल्ह्यातील जंगलात 11 सप्टेंबरला सुरक्षा जवान आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. जवळपास आठ तास चालेल्या चकमकीत सुरक्षा रक्षकांनी 10 नक्षलवाद्यांना ठार केले. यामध्ये काहींच्या डोक्यावर कोट्यवधींचे बक्षीस होते. जहाल माओवादी व केंद्रीसय समिती सदस्य मोडेम बाल कृष्णा उर्फ बालन्ना मनोज उर्फ रामचंद्र उर्फ राजेंद्र, उर्फ चिन्नी याचाही या चकमकीत खात्मा करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंध्रप्रदेश आणि ओडिशा राज्याच्या सीमेलगत छत्तीसगडमधील गारियाबंद जिल्ह्यात माओवादी यांची मोहिम सुरु होती. गुरुवारी सकाळी दबा धरुन बसलेल्या माओवाद्यांनी सुरक्षा बलावर जोरदार गोळीबार सुरु केला. त्याला सुरक्षा बलाच्या जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. सुमारे आठ तास चाललेल्या या चकमकीत 10 नक्षलवादी ठार झाले. तर काही जंगलात पळून जाण्यात यशस्वी झाले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सुरक्षा बलाने केलेली ही मोठी कारवाई मानली जात आहे. रायपूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक अमरेश मिश्रा यांनी या कारवाईला दुजोरा दिला आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा, कागदपत्रे सापडली असून हे सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी आता या भागात सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. नक्षलविरोधी कारवाई आणखी तीव्र केली जाणार असल्याचे सांगितले जाते.
सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत नक्षल कमांडर मनोज ठार झाल्याची माहिती आहे. मनोज हा बराच काळ छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या जंगलात सक्रीय होता. त्याच्या नेतृत्त्वात अनेक हिंसक कारवाया करण्यात आल्या होत्या. त्यांच्यावर सरकारने एक कोटी रुपयांचे बक्षिस ठेवले होते. इतर माओवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.