पोंभुर्णा:- मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यामध्ये मनरेगा अंतर्गत कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भूम पंचायत समितीमध्ये कार्यरत असणारे मनरेगाचे अधिकारी रवींद्र गोरख राख (पीटीओ) आणि बांगर (सीडीईओ) यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यातील सर्व पॅनेल तांत्रिक अधिकारी (पीटीओ) कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.
भूम पंचायत समितीमध्ये मनरेगा अंतर्गत कार्यरत असणारे रवींद्र गोरख राख पिटीओ आणि श्रीकृष्ण बांगर सीडीइओ यांच्यावर काही अज्ञात कंत्राटदारांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनरेगा अंतर्गत शासनाचा निधी अडवल्याच्या रागातून संबंधित कंत्राटदारांनी हे कृत्य केले आहे. हल्लेखोरांनी त्यांचे वाहन अडवून त्यांना लाकडी दांड्याने आणि लोखंडी सुऱ्याने मारहाण केली. या हल्ल्यामध्ये दोन्ही अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत.
या घटनेचा निषेध म्हणून पॅनेल तांत्रिक अधिकारी संघटना, महाराष्ट्रने तीव्र आंदोलन पुकारले आहे. घटनेच्या निषेधार्थ ११ व १२ सप्टेंबर २०२५ रोजी सर्व पीटीओ कर्मचाऱ्यांनी कार्यालयात काळी फीत लावून काम केले, तर येत्या १५ सप्टेंबर २०२५, सोमवारी संप पुकारण्यात आला आहे. पंचायत समिती पोंभुर्णा येथे नमिता बांगर गट विकास अधिकारी पोंभुर्णा यांना सदर घटनेची माहिती देऊन घटनेच्या निषेधार्थ काळी फीत लावण्यात आली. या संदर्भात, पॅनेल तांत्रिक अधिकारी संघटनेने हल्लेखोरांवर त्वरीत कारवाई व्हावी यासाठी रोहयो मंत्री भरतशेठ गोगावले, मनरेगा सचिव, मनरेगा आयुक्त नागपूर यांच्याकडे निवेदन दिले आहे.
प्रमुख मागण्या:
- * संबंधित गुन्हेगारांवर शासकीय नियमांनुसार कठोर शिक्षा व्हावी.
- * मनरेगा अंतर्गत कार्यरत सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना संरक्षण कवच मिळावे.
मनरेगासारख्या महत्त्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी करताना, भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार रोखण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणारे असे हल्ले ही गंभीर बाब आहे. या हल्ल्यांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेतील गुन्हेगारांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी पिटीओ संघटना महाराष्ट्र कडून करण्यात येत आहे.
यावेळी सतीश वाढई, संदिप गोहोकर, राजेंद्र कुळमेथे उपस्थित होते.



