गडचिरोली:- शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे तसेच माओवादविरोधी अभियानाच्या अतिशय प्रभावी अंमलबजावणीमुळे आजपर्यंत एकुण 716 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. तसेच सन 2022 ते आतापर्यंत एकुण 67 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून सन 2025 साली आतापर्यंत एकुण 34 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. या आत्मसमर्पित माओवादी सदस्यांचा सर्वंकष विकास होऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामिल होणे सुसह्य व्हावे यासाठी गडचिरोली पोलीस दलाकडून वेळोवेळी विविध उपक्रम राबविले जात असतात. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आत्मसमर्पित माओवाद्यांसाठी साक्षरता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
प्रोजेक्ट संजीवनी अंतर्गत पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मसमर्पित माओवाद्यांना शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार मिळवून देऊन त्यांचा सर्वागीण विकास साधण्याचा प्रयत्न केला जात असतो. याच उपक्रमांतर्गत गडचिरोली पोलीस दलाच्या प्रोजेक्ट संजीवनी तसेच महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी (एम.एस.एस.डी.एस.) यांच्या अंर्तगत देण्यात येणाया कौशल्य विकास प्रशिक्षणांकरिता किमान शैक्षणिक अर्हता 5 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मात्र यापैकी बहुतेक माओवादी चळवळीत सामील होण्यापूर्वी 4 थी - 5 वी पर्यंतचे शिक्षणसुद्धा पूर्ण केलेले नव्हते व काही आत्मसमर्पित माओवादी शालेय शिक्षणापासून पूर्णपणे वंचित राहिले होते.
सदर बाब लक्षात घेऊन गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने या अनुषंगाने जागतिक साक्षरता दिन दिनांक 08/09/2025 रोजी पासून ते 21/09/2025 या कालावधीत राबविण्यात आलेल्या या उपक्रमादरम्यान एकूण 106 आत्मसर्पित माओवाद्यांना साक्षरतेचे धडे देण्यात आले. सदर प्रशिक्षणामध्ये अक्षर ओळख, शब्दरचना, अंकगणित या सारख्या मूलभूत विषयांसोबत डिजीटल साक्षरतेचे धडे देखील देण्यात आले. यासोबतच आत्मसमर्पित माओवाद्यांना दैनंदिन जिवनात आवश्यक विविध गोष्टींचे ज्ञान देखील देण्यात आले.
सदर कालावधी मध्ये साक्षतेचे धडे घेणाया 106 आत्मसर्पित माओवाद्यांपैकी एकूण 42 आत्मसर्पित माओवाद्यांची साक्षरता चाचणी आज दिनांक 21/09/2025 रोजी पोलीस मुख्यालय येथील एकलव्य हॉल येथे घेण्यात आली. या चाचणीत उत्तीर्ण झाल्यानंतर सदर आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना साक्षरता प्रमाणपत्र देण्यात येवून ते 5 व्या आणि 8 व्या वर्गाच्या परीक्षेकरिता पात्र होणार आहेत. या साक्षरता मोहीमेच्या माध्यमातून सदर आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याची संधी निर्माण होवून त्यांच्यासाठी रोजगार आणि स्वंयरोजगाराचे नवीन मार्ग तयार होणार आहेत. याव्यतिरिक्त 8 वी व 10 वी वर्गाच्या परीक्षेकरिता पात्र माओवादी सदस्यांकरिता स्वतंत्र शिक्षण वर्गाचे देखिल आयोजन करण्यात येणार आहे.
सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली श्री. सुहास गाडे, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., माध्यमिक शिक्षणाधिकारी, गडचिरोली श्री. वासुदेव भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद गडचिरोलीचे शिक्षक वर्ग, आत्मसमर्पण शाखेचे अधिकारी व अंमलदार तसेच नागरी कृती शाखेचे अधिकारी व सर्व पोलीस अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.