चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील सांगोडा ग्रामपंचायतीत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, ग्रामस्थांनी या प्रकरणाची त्वरित चौकशी करण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासनाला निवेदन दिले असून, कारवाई न झाल्यास १५ सप्टेंबरपासून कोरपना पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.
पत्रकार परिषदेत ग्रामस्थांनी, पांदन रस्ता, नालीवरील रपटा, अंगणवाडीसाठी साहित्य खरेदी, शैक्षणिक साहित्य वाटप, अपंगांना निधी वाटप, आणि शौचालयाचा लाभ अशा विविध कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप केले. शुभम ढवस आणि इतर ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी सरपंच सचिन बोंडे यांच्या २०१५ ते २०२० या कार्यकाळात अनेक अनियमितता झाल्या आहेत.
२०२० मध्ये पूर्ण झालेल्या कामांसाठी २०२२ मध्ये निधी उचलला गेला. अंगणवाडी आणि जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी साहित्य खरेदी केल्याची नोंद कॅश बुकमध्ये आहे, पण प्रत्यक्षात ते साहित्य मिळाले नसल्याचे अंगणवाडी सेविका आणि शाळा व्यवस्थापनाने सांगितले आहे. तसेच, सात अपंगांना प्रत्येकी तीन हजार रुपयांचे वाटप केल्याची नोंद असूनही, कोणालाही पैसे मिळाले नाहीत. संजना सचिन बोंडे २०२१ पासून आजपर्यंत सरपंच आहेत. सरपंच संजना बोंडे यांचे पती सचिन बोंडे, हे कोणत्याही अधिकृत पदावर नसतानाही ग्रामपंचायतीचे कामकाज हाताळतात, आणि ग्रामसेवकांना आदेश देतात, असा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे संजना बोंडे यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
जर या प्रकरणाची चौकशी झाली नाही, तर १५ सप्टेंबरपासून कोरपना पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. या पत्रकार परिषदेत विठोबा दिनकर बोंडे, शुभम संजय ढवस, रवींद्र भाऊराव देवाळकर, जयभारत धोटे, आकाश रागीट, निशांत पिंपळकर, गौरव पाचभाई आदी उपस्थित होते.