राजुरा:- शेतकरी, कामगार, नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर आमदार शांत बसलेले असताना केवळ श्रेय घेण्याच्या राजकारणात मश्गुल आहेत, अशी जोरदार टीका माजी आमदार तथा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुभाष धोटे यांनी केली. राजुरा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आमदारांना चपराक देत जनतेच्या प्रश्नांकडे प्रशासन आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी मुद्दाम दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला.
“धोटे म्हणाले की, अवकाळी पावसाने शेतकरी उध्वस्त झाले असतानाही चंद्रपूर जिल्हा भरपाईतून वगळला गेला.” शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याऐवजी अन्यायकारक निकष लावले जात आहेत. खतांच्या टंचाईतही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले. “जिल्ह्यात पाच-पाच आमदार असतानाही शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही ही शोकांतिका आहे. जर शासनाने लक्ष दिले नाही तर काँग्रेस रस्त्यावर उतरेल,” असा इशारा त्यांनी दिला.
मतदार चोरी व बोगस नोंदणी प्रकरणावर थेट हल्ला
राजुरा मतदारसंघात ६८६१ नावे मतदारयादीतून वगळली गेली. एकट्या राजुरा शहरात ३१९५ बोगस मतदार नोंदले गेले. एवढे धक्कादायक प्रकार घडूनही जबाबदारांवर कार्यवाही नाही. भाजपचे आमदार “वोट चोरीच झाली नाही” असे म्हणतात आणि दुसरीकडे तक्रारी दाखल केल्याचा दावा करतात. “ही सरळसरळ बनवेगीरी आणि मतदारांचा घोर अपमान आहे,” असे धोटे यांनी फटकारले.
श्रेयासाठी नागरिकांना वेठीस धरण्याचा आरोप
सोनियानगर व इंदिरानगर घरकुल योजनेत काँग्रेसकाळात घरे वाटण्यात आली होती. मात्र सध्याचे आमदार त्याच घरांसाठी अर्ज मागवून नागरिकांची कागदपत्रे जमा करत आहेत. मृतकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देताना देखील आमदारांनी श्रेयासाठी कुटुंबांना भाजपा कार्यालयात दिवसभर बसवून चारवेळा स्टॅम्प पेपर बदलण्यास भाग पाडले. “शोकाकुल कुटुंबाचा अपमान करण्याइतकी नीच राजकारणाची पातळी गाठली गेली आहे,” असे धोटे म्हणाले.
जनतेचे प्रश्न दुय्यम, प्रसिद्धी मात्र पहिल्या क्रमांकावर
विजेचा लपंडाव, बॅनर-पोस्टरमुळे शहराचे विद्रूपीकरण, महिलांचे आधार कार्ड गोळा करून कूपन वाटप, डीजे प्रकरणात निष्पाप मंडळांवर गुन्हे दाखल, अशी जनतेची स्थिती बिकट आहे. पण आमदार फक्त व्हॉट्ऍप, मीडिया गाजावाजा करून श्रेय मिळवण्याचा आटापिटा करत असल्याचे धोटे यांनी ताशेरे ओढले.
काँग्रेसच्या काळातील कामे आजही जनतेच्या उपयोगी धोटे यांनी सांगितले की, काँग्रेसकाळात उपजिल्हा रुग्णालय, प्रशासकीय इमारती, ग्रामीण रुग्णालये, रस्ते, सौंदर्यीकरण प्रकल्प, वाचनालये अशा शेकडो विकासकामांना गती मिळाली. गोंडपिपरी व जिवती तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांवर वारंवार पाठपुरावा करून ठोस निर्णय घेतले गेले. मात्र महायुती सरकार आल्यापासून राजुरा मतदारसंघातील कामे प्रलंबित ठेवली गेली आहेत.
“जनतेच्या डोळ्यात धूळफेक बंद करा”
धोटे यांनी इशारा दिला की, “जनतेच्या खरी प्रश्नांवर पडदा टाकून केवळ श्रेय घेण्याचे राजकारण काँग्रेस कधीही सहन करणार नाही. जनता सर्व पाहत आहे आणि योग्य वेळी उत्तरही देईल.”
पत्रकार परिषदेला अरुण धोटे, सुरज ठाकरे, रंजन लांडे, सुनील देशपांडे, निर्मला कुडमेथे, प्रभाकर येरणे, हरजित सिंग संधु, गजानन भटारकर, अँड. चंद्रशेखर चांदेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.


