Chandrapur News: नगर प्रदक्षिणा पालखी सोहळा; पालखी दर्शनासाठी रस्त्यावर उमटला भक्तीचा महासमुद्र

Bhairav Diwase

चंद्रपूर:- श्री माता महाकाली महोत्सव निमित्त निघालेली भक्तिरस, धार्मिक उत्साह आणि विविधतेतील एकतेचे दर्शन घडवणारी श्री माता महाकाली नगर प्रदक्षिणा पालखी भव्य स्वरूपात पार पडली. मंदिरात सकाळपासूनच भाविकांची गर्दी उसळली होती. महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा आमदार किशोर जोरगेवार यांनी पालखी उचलून पालखी यात्रेला विधीवत प्रारंभ केला.


माता महाकालीच्या चांदीच्या मूर्ती व चांदीच्या पालखीने सजलेली ही मिरवणूक मंदिरातून निघून गांधी चौक, जटपूरा गेट मार्गे पुन्हा मंदिर परिसरात परतली. पालखीच्या मार्गावर ‘जय माता दी’च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते. शंख, तुताऱ्या, ढोल-ताशे आणि भक्तिगीतांच्या गजरात शहर भक्तिमय आणि उत्सवी रंगात न्हाऊन निघाले.
यंदा पालखीत जगराता गायक लखबीर सिंग लख्खा यांचे सुपुत्र पन्ना सिंग गिल लख्खा यांचा रोड शो हे विशेष आकर्षण ठरले. गंगा आरतीचे दिव्य दर्शन, पोतराजांचा पारंपरिक नृत्याविष्कार, उत्तराखंडमधील केदारनाथ धामचे झांज-डमरू पथक, मध्यप्रदेशातील शिवतांडव अघोरी नृत्य, कर्नाटक राज्यातील बाहुबली हनुमानाचे सजीव दृश्य अशा अनेक धार्मिक व सांस्कृतिक दृश्यांनी पालखीची शोभा अधिक वाढवली.


त्याचबरोबर पंढरपूर येथील १०८ वारकऱ्यांचा टाळ-मृदंग गजर, आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारे ढेमसा, रेला आणि ढोलशा नृत्य, अश्वावर आरूढ नवदुर्गेची झांकी, मुलांची शस्त्रप्रात्यक्षिके, व्यायामशाळांचे कौशल्यपूर्ण प्रयोग, प्रसिद्ध बँड पथके आणि कलशधारी महिला या सर्वांनी प्रदक्षिणेला एक भव्य, धार्मिक आणि अविस्मरणीय स्वरूप दिले. शहराच्या कानाकोपऱ्यातून नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत पालखी सोहळ्याचे दर्शन घेतले. माता महाकालीच्या कृपेने चंद्रपूर शहर नेहमीच भक्ती, संस्कृती आणि एकतेच्या मार्गावर वाटचाल करेल, अशा भावना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केल्या. या शोभायात्रेत शहरातील विविध भजन मंडळ, पठाणपूरा व्यायमशाळा, स्वराज्य ढोल पथक, ईस्नानच्या वतीने श्रीकृष्ण पालखी देखावा सादर केला होता. तसेच गायत्री परिवारातील कलशधारी महिला आणि बंगाली समाजाचे शंखनाथाने भक्तीमय वातावरण निर्माण केले.

विविध समाजांचा देखावे काढत सहभाग

बौद्ध समाज, आदिवासी समाज, उत्तरभारतीय समाज, नाभिक समाज, लिंगायत समाज, बेलदार समाज, बुरुड समाज, छिपरा समाज, क्षत्रिय पवार समाज, तेलगू समाज यांच्यासह विविध समाजांनी विविध देखावे सादर करत शोभायात्रेत सहभाग नोंदविला.


विविध संस्थांच्या वतीने फळ-पाणी वाटप सेवा

नगर प्रदक्षिणा पालखी सोहळ्यात विविध समाज, संघटनांनी चहा, फळ आणि पाणी वाटप करत सेवा दिली. यात कमल स्पोर्टिंग क्लब, गुरुद्वारा कमेटी, एलीवेट, जैन मंदिर संस्था, सराफा असोसिएशन, दाउदी बोहरा समाज, मुस्लिम हक्क संघर्ष समिती, सिंधी समाज, माहेश्वरी सेवा समिती, चांडक मेडिकल, आशा ड्रायफ्रूट, इमरान खान, अनुप पोरेड्डीवार, महेंद्र मंडलेचा, बशीर आदींनी सेवा दिली.