एटापल्ली:- एटापल्ली तालुक्यातील गरोदर मातेला रस्त्याअभावी पोहोचणे शक्य नसलेल्या रुग्णवाहिकेपर्यंत गावकरी व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने खाटेची कावड करून नेत तिचे प्राण वाचवण्यात आले. अतिदुर्गम एटापल्ली तालुक्यातील गोटाटोला गावात घडलेल्या घटनेने विकासाचा खोटा चेहरा पुन्हा एकदा उघडा पडला आहे. प्राप्त माहितीनुसार रुनिता दुम्मा (वय २०) ही गरोदर महिला रेकनार (कसनसुर) येथील रहिवासी असून काही दिवसांपूर्वी प्रसूतीसाठी गोटाटोला येथे आली होती.
मात्र, मंगळवार (ता. १४) सकाळी तिची प्रकृती अचानक खालावल्याने गावकऱ्यांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधला. गोटाटोला येथील आशा सेविकेने तत्काळ जारावंडी प्राथमिक आरोग्य केंद्राला कळवले. माहिती मिळताच समुदाय आरोग्य अधिकारी गजानन शिंदे यांनी वैद्यकीय चमूसह रुग्णवाहिका रवाना केली.
परंतु गोटाटोला गावाकडे जाणारा एक किलोमीटरचा रस्ता खराब असल्याने रुग्णवाहिका गावात पोहोचू शकली नाही. अशा कठीण परिस्थितीत आरोग्य कर्मचाऱ्यांनी पायदळ गावात पोहोचून प्राथमिक उपचार केले व गरोदर मातेला खाटेची कावड करून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या रुग्णवाहिकेपर्यंत आणले. त्यानंतर तिला जारावंडी आरोग्य केंद्रात दाखल करून तातडीने उपचार करण्यात आले. पुढील उपचारासाठी जिल्हा महिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गरोदर मातेची प्रकृती आता स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
या घटनेची माहिती आरोग्य विभागाला माहिती मिळताच कर्मचाऱ्यांनी तत्काळ गोटाटोला गावाकडे धाव घेतली. गरोदर मातेवर प्राथमिक उपचार करून रुग्णवाहिकेपर्यंत पायी खाटेवर पोहोचवण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी महिलेला गडचिरोली जिल्हा महिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गरोदर मातेची प्रकृती आता स्थिर आहे.
- डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी, गडचिरोली


