Chandrapur News: चंद्रपूर मनपा निवडणूक; भाजपमध्ये दोन गट सक्रिय

Bhairav Diwase
इच्छुक उमेदवारांकडून स्वतंत्रपणे अर्ज मागवले, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम
चंद्रपूर:- चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता असून, शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली असताना भाजपच्या दोन गटांकडून स्वतंत्रपणे अर्ज मागविल्याने कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घडामोडींमुळे निवडणुकीपूर्वीच पक्षामधील मतभेद चव्हाट्यावर येत असल्याचे चित्र दिसत आहे.

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व माजी उपमहापौर राहुल पावडे यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या संपर्क कार्यालयात इच्छुकांकडून अर्ज मागविले आहेत. तर दुसरीकडे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगोट्टवार यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. दोन्ही गटांनी वेगवेगळी पत्रके प्रसिद्ध केल्याने इच्छुकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, दोन्ही गटांकडे त्यांच्या-त्यांच्या समर्थकांनी प्रभागनिहाय उमेदवारीसाठी अर्ज सादर केले आहेत. एका गटाने १६ ते २० नोव्हेंबर तर दुसऱ्या गटाने १६ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत अर्ज मागवले आहेत. दोन्ही पत्रकांमध्ये वेगळ्या सूचना दिल्याने इच्छुकांची मोठी 'गोची' होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या अगदी तोंडावर भाजपमध्ये सुरू असलेली ही अंतर्गत हालचाल सध्या शहरात चर्चेचा विषय ठरली आहे.