चंद्रपूर:- शहरातील रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत जनता लॉन्चर येथील एका वसतिगृहात राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज, गुरुवार, दिनांक २० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी उघडकीस आली. प्रथमेश गुलाब चुदरी (वय १७ वर्षे) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ०७:३० ते ०९:०० वाजण्याच्या सुमारास प्रथमेश चुदरी याने जनता लॉन्चर येथील वरच्या मजल्यावर असलेल्या आपल्या खोलीत नायलॉनच्या दोरीने पंख्याला गळफास घेऊन जीवन संपवले. घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा केला.
वडिलांच्या तक्रारीवरून चौघांविरुद्ध गुन्हा:
या घटनेनंतर, मयत प्रथमेशचे वडील गुलाब विठुजी चुदरी (वय ४४ वर्षे, रा. धानोरा (पिपरी) यांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तोंडी तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, मयत प्रथमेशने त्यांना सांगितले होते की, वसतिगृहाचे वार्ड बॉय आणि व्यवस्थापनामधील कर्मचारी त्याला मानसिक त्रास देत आहेत आणि त्यामुळे त्याची मनस्थिती ठीक नाही. कुटुंबीयांनी त्याला समजावून शांत राहण्यास सांगितले होते, परंतु त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी या गोष्टीकडे अधिक लक्ष दिले नाही.
वडिलांच्या या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी त्वरित कारवाई करत, खालील आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे:
* लक्ष्मन रमाजी चौधरी (वार्डन)
* प्रेमा झोटींग (व्यवस्थापक)
* विष्णुदास शरद ठाकरे (सल्लागार)
* आशिष किष्णाजी महातळे (प्राचार्य)
या चौघांविरुद्ध कलम १०७ ३(५) भान्यास अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस करत आहेत. अल्पवयीन विद्यार्थ्याच्या आत्महत्येमुळे वसतिगृह आणि शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.


